
स्थैर्य, पुसेसावळी, दि. ०५ : जिल्ह्यात कोरोनाची संख्या प्रत्येक दिवसाला वाढत असताना पुसेसावळी ता. खटाव येथे वाढणारी गर्दी पाहता पुसेसावळीला कसलीच कोरोनाची भीती नाही का? होणारी गर्दी उघड्या डोळ्याने पाहत प्रशासन गांधारीची भूमिका का घेत आहे हे न उलघडणारे कोडे आहे.
पालकमंत्री, जिल्हाधिकारी वेळोवेळी कोरोना संदर्भांत सूचना देत आहेत. दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची विनंती करत आहे. गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पुसेसावळी येथे सर्व आदेशला केराची टोपली दाखवत गर्दी वाढत आहे. रस्त्याच्या दुतर्फा लोक दुकान मांडून बसत आहेत. खरेदीसाठी येणारे आपली वाहने रस्त्यावर कुठेही उभी करून खरेदीला जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.त्यामुळे दररोज वादावादी चे प्रकार घडत आहेत आणि हे सर्व पोलीस दूरक्षेत्राच्या हाकेच्या अंतरावर घडत असून देखील पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचारी होणारी गर्दी वाहतूक कोंडी कमी करण्याची तसदी घेत नाही.
पुसेसावळीत दररोज होणारी गर्दी पाहता रोगाला आमंत्रण देण्याचा प्रकार सुरु आहे. दुचाकीवरुन तीन-तीन व्यक्तींचा प्रवास, तीनचाकी वाहनातून चारजणांचा प्रवास, चारचाकीतून पाच-सहा लोकांचा प्रवास राजरोसपणे सुरु आहे. भाजीपाल्याचा व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरु असून कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर पाळले जात नाही. इतर व्यापाऱ्यांकडूनही जिल्हा प्रशासनाच्या कोणत्याच सूचनांचे पालन केले जात नाही. हॉटेल व्यवसायही सुरुच आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी न घेता सदरच्या गोष्टी घडत असताना पुसेसावळी ग्रामपंचायत व प्रशासन नक्की करते काय? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.