पुसेगाव ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी बुधवारपर्यंत जनता कर्फ्यूचा घेतला निर्णय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


  

स्थैर्य, सातारा, दि. १० : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुसेगाव ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी बुधवारपर्यंत (ता. 16) जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत औषध दुकाने व दवाखाने वगळता सर्व व्यवहार व बाजारपेठ बंद राहणार आहे. पुसेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. दररोज दहापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत.

उत्तरोत्तर वाढत जाणारा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुसेगाव ग्रामस्थ व येथील विविध व्यापाऱ्यांची मंगळवारी बैठक झाली. या वेळी पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव, प्रताप जाधव, माजी अध्यक्ष शिवाजीराव जाधव, अंकुशराव पाटील, सुश्रूत जाधव, प्रा. केशव जाधव, दीपक तोडकर, विविध व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते. पुसेगाव व परिसरातील विसापूर, नेर, वेटणे, खातगुण, बुधमध्ये बाधितांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठवड्यात पुसेगाव व परिसरात कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांची संख्याही वाढत आहे.

पुसेगाव ही परिसरातील मुख्य बाजारपेठ असल्याने येथे विविध गावांतून लोक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करतात. शिवाय सध्या वडूज, दहिवडी व कोरेगाव येथे लॉकडाऊन असल्याने येथील सर्व बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे वडूज, दहिवडी व कोरेगाव परिसरातील लोक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे सात दिवस पुसेगाव बाजारपेठही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत केवळ वैद्यकीय सेवा सुरू राहणार असून, इतर सर्व व्यवहार व बाजारपेठ काटेकोरपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!