पेयजल स्त्रोतांची शुद्धता तपासावी – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


पालकमंत्र्यांकडून विविध विकासकामांचा आढावा

स्थैर्य, अमरावती, दि. 02 : पावसाळा लक्षात घेऊन दूषित पाण्यामुळे कुठलेही साथरोग आजार पसरू नयेत यासाठी पेयजल स्त्रोत, पाईपलाईनच्या दुरुस्तीसह सर्व स्त्रोतांची शुद्धता तपासण्यात यावी, तसेच आवश्यक त्या सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबवावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती पंचायत समितीत विविध कामांबाबत आढावा बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. पंचायत समिती सभापती संगीता तायडे, उपसभापती रोशनीताई अडसपुरे, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी दिलीप पतंगराव यांच्यासह अनेक जि. प. सदस्य, पं. स. सदस्य आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जल स्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यात यावे. त्यासाठी प्रत्येक गावात सर्व्हेक्षण मोहिम राबवावी. नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध होईल यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत. अमरावती तालुक्यातील व महानगराच्या जवळ असलेल्या वलगाव, नांदगावपेठ या ठिकाणी कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्या. अमरावती महापालिकेच्या धर्तीवर अशा विविध गावांतून निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबवावी.

तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध आवास योजनांचा आढावाही पालकमंत्र्यांनी घेतला. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, अतिक्रमित पट्ट्यांच्या नियमानुकुलनाची प्रक्रिया गतीने राबवावी. प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळण्यासाठी आवास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अपूर्ण व प्रलंबित घरकुलांसाठी लागणाऱ्या निधीसंदर्भात शासनाकडे तत्काळ पाठपुरावा करावा. उपलब्ध होणाऱ्या तरतुदीतून नियोजनबद्धरित्या घरकुलांचा लक्ष्यांक पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

जनसुविधा विभागांतर्गत पाणीपुरवठा योजना, मुस्लिम कब्रस्तान, स्मशानभूमी, शाळादुरुस्ती आदी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले. तालुक्यातील रिक्त पदांचा आढावाही पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, परिचर आदी पदे भरण्यात यावीत. रिक्त असल्यास त्याचा पाठपुरावा करावा, असे निर्देश त्यांनी दिले. शेतकरी बांधवांना कृषी विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे. वीज मोटार पंप, बायोगॅस, विहिरी बांधकाम, सौर ऊर्जा कनेक्शन आदी विविध योजनांसाठी प्राप्त अर्जांवर वेळेत कार्यवाही होऊन शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळवून देण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

बियाणे उगवणीबाबतच्या तक्रारींबाबत कंपन्यांना नोटीस द्यावी

तालुक्यात १९ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यापैकी काही क्षेत्रावर बियाणे उगवण न झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा तक्रारी सर्वेक्षणातून प्राप्त करून घेऊन त्याबाबत सदर कंपन्यांना नोटीस बजावण्यात यावी. कंपन्यांनी नोटीस मिळताच दोन दिवसात शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई दिली पाहिजे अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील रस्ता बांधकाम, वृक्षलागवड, पांदणरस्ते, शोषखड्डे, गोठा बांधकाम, स्वच्छतागृह बांधकाम आदी प्राधान्याने राबविण्यात यावीत. तालुक्याला दिलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट नियोजनबद्धरित्या पूर्ण करावे.

अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन

महिला व बालविकास विभागाच्या कामांचा आढावाही त्यांनी घेतला. तालुक्यात १७७ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांत उत्कृष्ट कार्यपद्धती रूढ करण्याच्या दृष्टीने आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. नादुरुस्त अंगणवाड्यांची प्राधान्याने दुरुस्ती करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. आवश्यक तिथे बेबी केअर किटचे वितरण व्हावे. ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन, सायकल वाटप केले जाते. या सर्व योजनांची पारदर्शकरित्या अंमलबजावणी व्हावी. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे राबवावीत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले. गटविकास अधिकारी पतंगराव यांनी आभार मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!