प्रवचने – शुद्ध वातावरण व पवित्र आचरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


आपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणार्‍या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून, त्य प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादि सर्व काही यश संपादन करा; अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐष आरामात राहून गाद्यागिरद्यांवर लोळा; पण हे करीत असताना तुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. कोणाशी वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो, नंतर मान मिळविण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरुषसुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात, तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील, पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसे द्वेष मत्सरांतही गुंतू नका; दोन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाईक मेला, आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला; दोघेही मेल्याचे सुतक सारखेच ! त्याचप्रमाणे, मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखेच होते. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही; मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो. ढोंग, बुवाबाजी, इत्यादींच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केलेत तरी चालेल, पण ढोंग मुळीच करू नका. आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा, अगदी अनुभवाने मी सांगतो, की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून, त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरूरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असे म्हणतो, मग आमची वृत्ती का न सुधारावी ? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही, म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही.

श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपींकडे पाठविले. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचे नामावरचे प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटले. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे; ते पाहून उद्धवाने देवाला सांगितले, “देवा, तू मला ज्ञान दिलेस खरे, पण तुझ्या भक्तीचे प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे, ते तू मला दे.” खरोखर, त्या नामाचे माहात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्वजण इथे आला आहात; इथून रामाजवळून काही मागून न्यायचे असेल तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा. राम कृपा करील, हा भरवसा बाळगा.

आपल्या जीवनात सहजता हवी. सहजतेमध्ये समाधान आहे.


Back to top button
Don`t copy text!