शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर; नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली आहे. या अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीककर्ज माफ केले जाणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ६ मार्च : राज्य शासनाने राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ लागू करण्याची मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीककर्ज माफ करण्यात येणार आहे.

कोणते शेतकरी ठरणार पात्र?

या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने निकष स्पष्ट केले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत झालेले आहे, केवळ असेच शेतकरी या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. यामुळे नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या आणि कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने उभे राहण्यासाठी मोठे बळ मिळणार आहे.

प्रामाणिक शेतकऱ्यांचाही सन्मान! ५० हजारांचे प्रोत्साहन

केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दिलासा न देता, शासनाने प्रामाणिकपणे व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही या निर्णयात विचार केला आहे. जे शेतकरी घेतलेल्या पीककर्जाची वेळेवर आणि नियमितपणे परतफेड करत आहेत, अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना शासनाकडून ५० हजार रुपयांपर्यंतची प्रोत्साहनपर रक्कम (Incentive) दिली जाणार आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून, थकीत कर्ज माफ झाल्याने त्यांना आता आगामी खरीप हंगामासाठी नव्याने कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!