स्थैर्य, जामखेड, दि. 01 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जन्मगावी चौंडीतील तीर्थस्थळावर भाजपचे माजीमंत्री प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एकत्र येऊन अहिल्यादेवींच्या स्मृतिस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या दरम्यान मिळालेल्या वेळेत ‘कुकडी’ च्या आवर्तनाबाबत दोघांमध्ये चर्चा रंगली. विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा शिंदे व पवार हे दोघे एकत्र आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 295 वी जयंती साजरी होत आहे. गेल्या 25 वर्षांपासुन चौंडीत मोठ्या प्रमाणावर जयंती सोहळा साजरा होतो. दरवर्षी 31 मे रोजी राज्य व देशभरातील कार्यकर्ते, राज्यकर्ते चौंडीत येतात. मात्र करोनाच्या लॉकडाऊनमुळे जयंती घरीच साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन प्रा. शिंदे यांनी केले होते. आज सकाळी अहिल्यादेवींच्या पुतळ्याला महाभिषेक, पुष्प अर्पण कार्यक्रम झाला. प्रा. शिंदे, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार रोहित पवार, अक्षय शिंदे, अविनाश शिंदेंच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कुकडीच्या पाण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक दिवसानंतर प्रा. शिंदे व आ. पवार आणि त्यांचे कार्यकर्ते एकत्र पहायला मिळाले. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. करोनाच्या काळात दोघांमधील राजकारण चांगलेच तापले होते. दुसऱ्यांदा चौंडीत प्रा. शिंदे आणि आ.पवार एकत्र आले. यापूर्वी विधानसभा निवडणूक निकालानंतर त्याच दिवशी आ. पवार यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रा. शिंदेंच्या पराभवानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
शिंदेच्या आई -वडिलांचे आशीर्वाद घेतले होते. आ. पवारांनी दाखविलेला सुसंस्कृतपणा अनेकांना भावला होता. तसेच प्रा. शिंदेंनी त्यांचा फेटा बांधून केलेला सत्कार पट्टीतील राजकारण्याचे प्रतीक ठरला होता. यावेळी दोघांच्या कार्यकर्त्यांची फौज सोबत होती. आज रविवारी सकाळी नऊ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दुसऱ्यांदा हा योग येथेच जुळून आला.