
दैनिक स्थैर्य | दि. 20 फेब्रुवारी 2025 | फलटण | श्रीक्षेत्र लाटे (ता. बारामती) येथून श्रीक्षेत्र किरकसाल (ता. माण)कडे जाणाऱ्या आणि परतीच्या प्रवासात शेवटच्या मुक्कामी थांबणाऱ्या पुण्यमाता आईसाहेब महाराज पालखी सोहळ्याचे भाडळी बु. येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. हा सोहळा गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा झाला.
फलटण दहिवडी रस्त्यावरून गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. प्रवेशद्वारातून पालखी सोहळा मुख्य चौकात आल्यानंतर, ग्रामस्थांसह दैनिक स्थैर्यचे संपादक प्रसन्न रुद्रभटे, पोलीस पाटील हनुमंत सोनवलकर आणि शिक्षक नेते सुभेदार डुबल यांच्या शुभहस्ते पालखी रथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाडळी बु. गावातील ग्रामस्थ तसेच महिला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पालखी सोहळ्याचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने सर्व भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. स्वागत समारंभानंतर ह.भ.प.शैला महाराज बगाडे यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले. तदनंतर ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी गावातील आजी माजी सैनिक, महिला, तरुण वर्ग तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान स्वागत समारंभामध्ये गावातील ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी सुंदर असे हरिपाठाचे प्रदर्शन केले. शेवटी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक मातोश्री संस्था समुहाचे संस्थापक मोहनराव डांगे यांनी केले. शेवटी आभार ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. स्वप्निल महाराज शेंडे यांनी मानले.
पुण्यमाता आईसाहेब महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत भाडळी बु. गावात उत्साहाने साजरे करण्यात आले, यामुळे गावातील लोकांमध्ये आध्यात्मिक चैतन्य वाढले. या सोहळ्याने समाजातील एकता आणि सामाजिक सौहार्दाची भावना जागृत केली.