दैनिक स्थैर्य | दि. २ फेब्रुवारी २०२५ | पुणे |
अहिल्यानगर येथे झालेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने बाजी मारली. त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये अंतिम लढत झाली. त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळला पहिला पॉईंट मिळाला. नंतर दुसरा पॉईंट महेंद्र गायकवाडने मिळवला आणि बरोबरी केली. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळने पुन्हा एकदा एक पॉईंट घेतला. त्यानंतर मात्र काहीसा गोंधळ झाला आणि महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं.
पृथ्वीराज मोहोळच्या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याला चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं…
पृथ्वीराज मोहोळने दुसरा गुण मिळवल्यानंतर त्याबद्दल महेंद्र गायकवाडने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. पृथ्वीराजला दुसरा गुण हा चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचं त्याचं मत होतं. त्यामुळे नाराजी व्यक्त करत त्याने मैदान सोडलं. त्यानंतर पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं.
सामन्यादरम्यान काही प्रेक्षकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून त्यांना बाजूला केलं. त्याचवेळी महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं.
शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील उपांत्य सामन्यात गोंधळ झाल्याचं दिसून आलं. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत पराभव झाल्याचा निकाल देताच डबल महाराष्ट्र केसरी अशी ख्याती असलेला पैलवान शिवराज राक्षे याने थेट पंचांना लाथ मारली. त्यानंतर या स्पर्धेत अभूतपूर्व असा गोंधळ उडाला. अखेर पोलिसांना यावेळी मध्यस्थी करावी लागली.
मॅट विभागामधून नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी ठरलेला पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना पार पडत होता. दोघांमध्ये काँटेची टक्कर सुरु असताना शिवराज राक्षे याचा पराभव झाल्याचं पंचांनी जाहीर केल्यानंतर हा राडा झाला.
शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी राग अनावर झालेल्या शिवराजने पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथही मारली.
दरम्यान, पंचांना लाथ मारल्यामुळे संतप्त झालेल्या सर्व पंचांनी याविरोधात मैदानातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे.