पर्यायी इंधनावरील वाहनांच्या क्षेत्रात पुणे नेतृत्व करेल – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०२ एप्रिल २०२२ । पुणे । पुणे परिसरात पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या आणि या क्षेत्राशी संबंधित विविध उद्योग येत असून भविष्यात पुणे या क्षेत्राचे नेतृत्व करेल आणि इतरांना पुण्याचे अनुकरण करावे लागेल, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

नवीन कृषि मैदान येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रायोजित आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर पुणेच्या सहयोगाने आयोजित पहिल्या पुणे पर्यायी इंधन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयातील प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे महानगर विकास प्राधिकारणाचे सुहास दिवसे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, एमसीसीआयएचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गिरबाने,  संचालक एस. एच. कोपर्डेकर आदी उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले, प्रदूषण मुक्ती, रोजगार उपलब्धता आणि पर्यायी इंधनाचा उपयोग वाढविण्यासाठी असे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. पर्यायी इंधनावरील वाहनांमुळे महापालिकांच्या सार्वजनिक वाहतूक सेवेवरील खर्च कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अशा वाहनांना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. येत्या 2-3 वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन उभे राहतील. नव्याने या क्षेत्रात उद्योग करु इच्छिणाऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणेही गरजेचे असून शासन त्यासाठी निश्चितपणे सकारात्मक भूमिका अदा करेल, असे त्यांनी सांगितले. पर्यावरण बदल परिषदेच्या माध्यमातून विविध विभागांच्या समन्वयाने शेतकऱ्यांसाठीदेखील उपयुक्त तंत्रज्ञान व साधने विकसीत व्हावीत यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही ते म्हणाले.

पुण्यात पर्यायी इंधनाच्या क्षेत्रात चांगले काम होत असल्याचे नमूद करून पर्यावरणमंत्री ठाकरे म्हणाले, परिषदेच्या माध्यमातून बायोइंधन आणि हायड्रोइंधनावरील सर्व वाहन उत्पादक संस्थांनी परिषदेत सहभाग घेतला आहे. इलेक्ट्रीक वाहनांचे सर्व पर्याय येथे उपलब्ध आहेत. काही स्टार्ट अप्सनीदेखील सहभाग नोंदविला आहे. बाहेरील उद्योगांसाठी महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेला एकाच ठिकाणी पर्यायी इंधनावरील वाहनांचे चांगले पर्याय उपलब्ध होणार असून नव्या वर्षाच्या मुहुर्तावर ही चांगली सुरूवात असल्याचे त्यांनी सांगितले. बाहेरील उद्योगांच्या प्रतिनिधींनी आणि नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

उद्घाटनानंतर श्री. ठाकरे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन पर्यायी इंधनावरील वाहने व तंत्रज्ञानाची माहिती घेतली. त्यांच्या हस्ते 8 नव्या उत्पादनांचे उद्घाटन करण्यात आले, त्यापैकी 2 स्टार्ट अप्स आहेत. प्रादेशिक परिहवन विभागातर्फे वाहन खरेदी करणाऱ्याला दोन दिवसात नोंदणी करून देण्याची सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!