स्थैर्य, पुणे, दि.२४: व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकदारांसाठी आजही पुणे जिल्ह्याचे आकर्षण कायम आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत मंगळवारी झालेल्या करारात एकट्या पुणे जिल्ह्यात सात कंपन्यांनी तीन हजार ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. त्यातून तब्बल २८ हजार ८७० रोजगार निर्माण होणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मुंबईत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत २५ बड्या कंपन्यांनी ६१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. पुणे, सातारा, रायगड, धुळे, पालघर, औरंगाबाद, जळगाव, नगर, कोल्हापूर, ठाणे, अमरावती आदी जिल्ह्यांत हे उद्योग लवकरच उभे राहणार आहेत. यातील सर्वाधिक प्रकल्प पुणे जिल्ह्यात येत आहेत. सात उद्योगांनी पुण्याला पसंती दिली आहे.
पुण्यात येणाऱ्या उद्योगामध्ये गोयल गंगा, जीजी मेट्रोपोलिस, ग्रावीस, बजाज ऑटो, ॲम्प्स फार्मटेक्स इंडस्ट्रीज, सोनाई इटेबल इंडिया, क्लीन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी या कंपन्यांचा समावेश आहे. गोयल गंगा आणि जीजी मेट्रोपोलिस यांनी आयटी पार्कमध्ये गुंतवणूक केली आहे. पुणे शहरात त्यामुळे अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. त्यातून २५ हजार नोकऱ्या आयटी सेक्टरमध्ये निर्माण होणार आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणून गुंतवणूक आकर्षित करण्याची आपली लीडरशिप राज्य सरकारने कायम ठेवली आहे, ही आनंदाची बाब आहे. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. करार झालेले प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होतील अशी अपेक्षा आहे. पुणे विभागात येणाऱ्या या उद्योगांना उभे राहण्यासाठी जी काही मदत शक्य आहे, ती करण्यास मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर तयार आहे. तशा पद्धतीची बोलणी आम्ही सरकारशी केली आहेत.