स्थैर्य, सातारा, दि. 22 : राज्यातील बेरोजगार तरुणांची सैन्यात भरतीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलीसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.आज त्यांना कोर्टात हजर केले असता १० दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे तपासात राजकीय व पोलीस अधिकारी, कर्मचारी गळाला लागणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
दरम्यान, किशोर दादा जाधव (कुरकुंभ, ता. दौंद) यांने भिगवण पोलीस ठाण्यात आकाश डांगे व नितीन जाधव या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने दोघांना पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली होती शनिवारी (दि. 20) न्यायालयाने त्या दोघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रॅकेटचा मुख्य सुत्रधार आकाश काशिनाथ डांगे (वय 25 रा. भाडळी बुद्रूक ता.फलटण जि.सातारा) यास फलटण येथून तर नितीन तानाजी जाधव (वय 30, रा. बारामती) यास बारामतीतून अटक करण्यात आली होती.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, आयएनएस शिवाजी लोणावळा येथे इंडीयन नेव्हीमध्ये स्टोअर किपरची नोकरी लावतो असे आमिष कुरकुंभ येथील किशोर जाधव यांना दोन वर्षांपासून आरोपी दाखवत होते. तर जाधव यांना विश्वास बसावा म्हणून आरोपी डांगे भारतीय नौदलात (नेव्ही) नेमणुकीस नसताना सुद्धा नौदालाचा पोषाख परिधान करून किशोर जाधव यांच्याकडून भिगवण व लोणावळा येथे एकूण 3 लाख 80 हजार रूपये घेत त्यांना आयएनएस शिवाजी लोणावळा या नावाचे बनावट ई मेलवरून नौदलाचे बनावट नियुक्ती पत्र, ऍडमीट कार्ड पाठवून नोकरी न लावता फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किशोर जाधव यांनी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी चौकशी करून माहिती घेतली असता तरुणासह इतर अनेक बेरोजगार तरुणांची सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची व यामागे मोठे बोगस रॅकेट असल्याची माहिती मिळाली. हे प्रकरण देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर स्वरूपाचे असल्याने यासाठी तात्काळ पुणे ग्रामीणचे गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमून तपासास सुरुवात केली असता हे दोघे हाथी लागले असून त्यांनी गुन्हांची कबुली दिली आहे.