पुणे एलसीबी कडुन बोगस सैन्य भरती रॅकेटचा पर्दाफाश; फलटण येथुन तोतया नौदल अधिकार्‍यासह दोघांना अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : भारतीय नौदलाचा अधिकारी असल्याचे भासवत नौदलात स्टोअर किपरची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शेकडो बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या प्रकरणी दोघा भामट्यांच्या मुसक्या आवळलया आहेत. राज्याच्या विविध भागातील शेकडो बेरोजगारांना नौदलात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी तीन ते चार लाख रुपये या प्रमाणे एकूण कोट्यवधी रुपये उकळल्याची कबुली अटक केलेल्या भामट्यांनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आकाश काशिनाथ डांगे (वय 25, रा.भाडळी बु॥ ता.फलटण जि.सातारा) आणि नितीन तानाजी जाधव (वय 30, रा.कल्पनानगर, बारामती), अशी अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत. याबाबत किशोर दादा जाधव (रा.कुरकुंभ, ता.दौंड, जि.पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

दोन वर्षांपूर्वी आरोपींनी जाधव यांना भारतीय नौदलात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. आरोपी डांगे यांने नौदल अधिकार्‍याचा गणवेश परिधान करून अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादीकडून भिगवण आणि लोणावळा येथे एकूण 3 लाख 80 हजार रुपये घेतले. त्यानंतर आयएनएस शिवाजी लोणावळा या नावाच्या बनावट ई मेलवरून इंडीयन नेव्हीचे बनावट नियुक्ती पत्र, मेडीकल पत्र व डमीट कार्ड पाठवून नोकरी न लावता फिर्यादी तसेच अनेक बेरोजगारांची फसवणूक केली.

दरम्यान, फिर्यादी जाधव यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन त्यांना या फसवणुकीच्या प्रकाराबाबत माहिती दिली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक पाटील यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर धनवट यांना तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार धनवट यांनी केलेल्या चौकशीत फिर्यादी जाधव यांच्यासह शेकडो तरुणांची सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची व यामागे मोठे बोगस रॅकेट असल्याची माहिती उजेडात आली. सदरचे प्रकरण हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर स्वरूपाचे असल्याने तात्काळ पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमून तपासास सुरुवात केली.

या पथकाने गुन्हयाची माहिती घेवून बारामती येथून आरोपी नितीन जाधव यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या रॅकेटचा मुख्य सुत्रधार आकाश डांगे याला फलटण येथून ताब्यात घेतले. दोघांकडे प्राथमिक चौकशी केला असता त्यांनी पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा, वाशीम, जळगाव तसेच मराठवाडा विदर्भ जिल्हयातील दहावी, बारावी शिक्षण झालेल्या बेरोजगार तरूणांना तेथील ओळखीच्या एजंटमार्फत भारतीय नौदलात नोकरी लावण्याचे खोटे अमिष दाखवून प्रत्येकी 2 ते 4 लाख याप्रमाणे कोट्यवधी रूपये घेवून फसवणूक केल्याचे सांगितले.

त्यानुसार भिगवण पोलीस ठाण्यात दाखल झालेलया फसवणुकीच्या गुन्हयात दोघांना अटक करण्यात आली. या गुन्हयाचा पुढील अधिक तपास भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने करीत आहेत. या गुन्हयात आरोपींचे आणखीन साथीदार निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, अनिल काळे, रविराज कोकरे, महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, रौफ इनामदार, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरूनाथ गायकवाड, संतोष सावंत यांनी महत्वाची कामगिरी केली.

सैन्यदलात नोकरीचे आमिषाने फसवणूक झालेले बेरोजगार तरुण आपल्याला नोकरी मिळेल किंवा आपण दिलेले पैसे आज, उद्या परत मिळतील या खोट्या आशेने पोलिसात तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. या आरोपींनी अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पाषाण रोड, पुणे (फोन नं.020-25651353) येथे संपर्क साधावा. तसेच बेरोजगार तरूणांनी सैन्यदलात व इतर सरकारी नोकरीस लावतो या अमिषाला बळी न पडता स्वतःची फसवणूक टाळावी, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!