पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही फक्त सुरुवात! – चंद्रकांतदादा पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला टोला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२५ जानेवारी २०२२ । मुंबई । पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रदीप कंद यांची निवड झाली. या निवडीमुळे पुणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण असून, या विजयामुळे राज्याच्या राजकारणालाही वेगळी दिशा मिळाली आहे. त्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही फक्त सुरुवात आहे, आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात अजून उलथापालथ नक्की होईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदीप कंद यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला भोसरीचे आ. महेश लांडगे, दौंडचे आ. राहुल कुल, भाजपा पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे, भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, पुणे मनपा सभागृह नेते गणेश बिडकर, रंजनकाका तावरे,  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर नानी घुले यांच्यासह इतर मान्यवर आणि पुणे जिल्ह्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

श्री पाटील म्हणाले की, “नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात क्रमांक एकचा पक्ष राहिला. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दुर्बीण लावून शोधण्याची गरज आहे. पोपटाचा प्राण पुणे ग्रामीण मध्येच आहे. त्यामुळे पक्षाने संकल्प करून बारामतीमधूनच आपण सुरुवात केली. बारामती लोकसभा निवडणूक अतिशय ताकदीने लढलो. त्यासाठी मी स्वतः बारामतीत घर घेऊन राहिलो. काही समीकरणे जुळून आली असती, तर आज वेगळे चित्र पहायला मिळाले असते.

ते पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर विश्वासघाताने सरकार गेलं. पण पाच वर्षात भाजपने अतिशय नम्रपणे काम केल्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोनवेळा शंभरपेक्षा जास्त जागी भाजपला विजय मिळाला. गेल्या विधानसभा निवडणुकीतही युती असूनही भाजपाला १०५ जागांवर विजय मिळाला.”

ते पुढे म्हणाले की, “कोविडनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रुपाने आपल्याला संधी मिळाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपण पॅनल उभे केल्याने अनेकांच्या पोटात गोळा आला होता. प्रदीप कंद यांची विरोधकांना जास्तच भिती वाटत होती. पण निकालानंतर प्रदीप कंद यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत दमदार प्रवेश झाला. त्यानंतरही संचालकपदाच्या निवडणुकीत कंद यांना ज्या पद्धतीने विजय मिळाला, त्यामुळे विरोधकांना धक्काच बसला. तेव्हा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही फक्त सुरुवात आहे. आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात अजून उलथापालथ होणार आहे. अनेक निवडणुका होणार असून, त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे.”

आ. महेश लांडगे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला माझ्यामुळे तुम्ही मोठे झाला, असे वाटतं. पण वास्तविक, ज्या कार्यकर्त्यांमुळे ते मोठे झाले, त्यांचं योगदान ते विसरतात. प्रदीप कंद यांचा विजय मोठा आहे. कारण, त्यापाठिमागे त्यांची मेहनत आणि त्याग असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

आ. राहुल कुल म्हणाले की, “पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही तशी सोपी नाही. माननीय चंद्रकांतदादांच्या निर्णयानंतर जिल्ह्यात चाचपणी सुरू केली. त्यानंतर मतदार यादीनुसार काम करत असताना विजयाचा विश्वास वाटू लागला. निकालानंतर सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवंत, विक्रमी मतांनी प्रदीपदादांचा विजय झाला. कारण, प्रदीप कंद विजयी व्हावेत, ही लोकभावना होती; आणि त्याचेच प्रतिबिंब निवडणूक निकालात दिसते. त्यामुळे एक लिटमस टेस्ट या निवडणुकीच्या निमित्ताने झाली. आता भविष्यात सर्वांनाही सोबत घेऊन सन्मानाने काम करुया. तसेच जिल्हा बॅंकेत आता कुणाचीही अडवणूक होणार नाही,” असा विश्वास व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना प्रदीप कंद म्हणाले की, “पक्षाने आदेश दिल्यावर, कठोर परिश्रम घेणं, ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने पक्षाने आदेश दिला, त्यामुळे वरिष्ठाचा आदेश प्रमाण मानून काम केले. यात सर्वांची मदत मिळाली, त्यामुळे हा विजय साकारणे शक्य झाले.”


Back to top button
Don`t copy text!