स्थैर्य, पुणे, दि. १७: पुण्याच्या सायबर गुन्हे शाखेने सव्वा दोनशे कोटी रुपयांच्या सायबर दरोड्याचा कट उधळून लावला आहे. या प्रकरणात एका प्रसिद्ध चॅनलच्या मालकासह इतर 8 जणांच्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सोबतच, या लोकांकडून पोलिसांनी 25 लाख रोख रुपये, 11 मोबाईल फोन, एक क्रेटा कार, एक डस्टर कार आणि एक स्कूटर असा एकूण जवळपास 43 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
असा घालणार होते सायबर दरोडा
पुण्यातील महर्षी नगर येथे असलेल्या ICICI आणि HDFC बँकेच्या डोरमंट अकाउंटचा (व्यवहार बंद असलेले खाते) डेटा पुण्यातील हॅकर्सच्या मदतीने चोरला जात होता. याची गुप्त माहिती पुणे सायबर गुन्हे शाखेच्या हाती लागली. यानंतर पोलिसांनी एक टीम तयार केली आणि महर्षी नगर येथे जाऊन सापळा रचला. या टीममध्ये पुणे सायबर सेलचे एक्सपर्ट सुद्धा होते. त्याचवेळी एका ऑरेंज रंगाच्या क्रेटा कारमधून एक व्यक्ती उतरली. त्यानंतर त्याच ठिकाणी 5 पुरुष आणि 1 महिला देखील आली. त्यांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले. सविस्तर तपास केला असता त्यांच्याकडे 216 कोटी 29 लाख 34 हजार 240 रुपये एवढ्या रकमेच्या डॉरमंट अकाउंटची माहिती असल्याचे समोर आले.
आरोपींमध्ये चॅनलच्या मालकाचेही नाव
आरोपींपैकी एक रोहन रविंद्र मंकणी याने हा डेटा चोरून सिंहगड रोडला राहणाऱ्या सुधीर शांतीलाल भटेवरा उर्फ जैन याच्याकडे देणार होतो अशी कबुली दिली. यानंतर धागेदोरे लागले आणि मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरूनही दोन जणांना अटक करण्यात आली. हे दोघे गुजरातचे होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, आरोपींपैकी दोन जण औरंगाबादचे असून ते एका खासगी वृत्तवाहिनीचे मालक आणि संचालक आहेत असेही सूत्रांकडून समजते.