शनिवारी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम मुळे बंद राहणार; पहा सविस्तर

टोलविरोधात पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची मोठ्या आंदोलनाची घोषणा; पुणे-बंगलोर महामार्गावर शनिवारी चक्का जाम; पृथ्वीराज चव्हाण, सतेज (बंटी) पाटील, विश्वजित कदम, संग्राम थोपटे एकाचवेळी आंदोलन करणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 31 जुलै 2024 | कोल्हापूर | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने येत्या शनिवारी ३ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री, आमदार सतेज (बंटी) पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत.

पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या आज झालेल्या झूम मिटिंगमध्ये काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली. पुणे-कोल्हापूर नॅशनल हायवेचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. सद्यपरिस्थितीत प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे खड्डे अशी परिस्थिती आहे. रस्त्याचे काम वेळेत होत नाही. महामार्गची प्रचंड दुर्दशा झाली असून वाहने चालवणे मुश्किल आहे. अशावेळी टोल माफ व्हावा, टोलमध्ये सवलत मिळावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी आंदोलन उभे केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नेते एका एका टोल नाक्यावर उभे राहून आंदोलन करणार आहेत. त्यांच्यासोबत प्रदेश व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे नेते आंदोलनात उतरतील. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आज याबाबतची घोषणा केली.

काँग्रेसकडून टोल नाका परिसरात चक्काजाम आंदोलन करून वाहने विना टोल सोडली जाणार आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजता पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात कोल्हापूर (किणी), पेठनाका, कराड (तासवडे), सातारा (आनेवाडी) व खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर आंदोलन केले जाणार आहे. महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने आणि रस्त्याची दुरावस्था झाल्याने काँग्रेसने या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी चार जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांची झूम मिटिंग घेण्यात आली. या मिटिंगमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज (बंटी) पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी रणजित देशमुख, राजेंद्र शेलार, शशांक बावचकर, राहुल खंजीरे, पृथ्वीराज पाटील, विजयानंद पोळ, मनोहर शिंदे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांसह जनतेने मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मा. पृथ्वीराज चव्हाण व मा. सतेज (बंटी) पाटील यांनी केले आहे.

कोल्हापूरच्या किणी टोल नाका येथे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कराडमधील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील. सातारा जवळच्या आनेवाडी टोल नाक्यावर डॉ. सुरेश जाधव, रणजित देशमुख, राजेंद्र शेलार यांच्यासह माण, खटाव, फलटण, कोरेगाव, सातारा, वाई, जावळी व खंडाळा तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील. पुण्यातील खेड शिवापूर या टोलनाक्यावर काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील.


Back to top button
Don`t copy text!