पाडळीतील मानाच्या सासनकाठीचे पूजन, प्रस्थान कार्यक्रम रद्द; कोरोनाजन्य परिस्थितीमुळे प्रथेत बदल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नागठाणे, दि. २४: पाडळी (निनाम, ता. सातारा) येथील मानाच्या सासनकाठीचे तसेच पोषाखाचे आज पारंपरिक प्रथेनुसार पूजन करण्यात आले. मात्र, सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीमुळे वाडी रत्नागिरीकडे होणारा प्रस्थान कार्यक्रम रद्द करण्यात आला.

वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील डोंगरावर चैत्र पोैर्णिमेला श्री ज्योतिर्लिंगाची मोठी यात्रा भरते. राज्यातील प्रसिद्ध यात्रांत तिची गणना होते. या यात्रेत आयोजित करण्यात येणार्‍या छबीना सोहळ्यात पाडळी येथील सासनकाठीला मानाचे अग्रस्थान असते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. त्या दृष्टीने आज प्रस्थानाचा दिवस होता. मात्र, कोरोनाजन्य परिस्थितीमुळे संचारबंदी असल्याने आज गावात सर्वत्र शुकशुकाट होता. श्री ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्या 15 एप्रिल रोजी आयोजित संयुक्त बैठकीत यात्रेचे स्वरूप व नियोजन ठरवण्यात आले होते. त्यानुसार सासनकाठीच्या धार्मिक विधीसाठी पाच जणांची नेमणूक करण्यात आली.

नियोजनानुसार संबंधितांच्या हस्ते सासनकाठीच्या पोषाखाचे पूजन करण्यात आले. एरवी दरवर्षी सासनकाठीचे प्रस्थान मोठ्या उत्साही वातावरणात होते. केवळ पाडळीच नव्हे, तर नागठाणे, निनाम, मांडवे, सोनापूर, भरतगाव आदी लगतच्या गावांतील भाविकही मोठ्या संख्येने सासनकाठीला निरोप देण्यासाठी उपस्थित असतात. काठीसोबत दरवर्षी 10 ते 15 बैलगाड्या तसेच 100 हून अधिक भाविक जात असतात. पायी मार्गक्रमण करत ही काठी जोतिबा डोंगरावर पोचते. यंदा मात्र कोरोनाजन्य परिस्थिती, प्रशासनाचे आदेश यामुळे प्रस्थान सोहळा रद्द करण्यात आला.

सरकार दरबारी पाडळीची नोंद
1899 मध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्लेगची साथ आली होती. परिणामी जिल्ह्यातील सर्व यात्रा बंद करण्याच्या सूचना शाहू महाराजांनी दिल्या होत्या. त्यातून संस्थानाच्या आदेशानुसार चैत्री यात्रेचा सोहळा रद्द करावा लागला होता. पाडळीच्या सासनकाठीस मानाचे स्थान दिल्याची नोंदही सरकारी दरबारी आहे. त्याकाळी शाहू संस्थानने पाडळीच्या ग्रामस्थांचा गौरवही केल्याचे सांगितले जाते.


Back to top button
Don`t copy text!