बिल्डर्स असोसिएशन फलटण सेंटरच्या ‘स्मृतीगंध’ ई-मॅगझिनचे श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते प्रकाशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ जुलै २०२३ | फलटण |
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या फलटण सेंटरने ‘स्मृतीगंध’ या ई-मॅगझिनचे प्रकाशन नुकतेच केले. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या फलटण सेंटरच्या या पेपरलेस पुस्तकाचे प्रकाशन विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी करण्यात आले.

दि. ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन व माझी वसुंधरा अभियानांतर्गत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटर, वॉकर्स ग्रुप फलटण आणि सगुणामाता कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथील न्यायालय व विमानतळ परिसरात ३५० झाडांचे रोपण श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ‘स्मृतीगंध’ या बिल्डर्स असोिएशनने काढलेल्या ई-मॅगझिनचे कौतुक श्रीमंत रामराजे यांनी केले. बिल्डर्स असोसिएशनचे ‘स्मृतिगंध’ हे ई-मॅगझिन फलटणकरांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

फलटण बिल्डर्स असोसिएशनने ई-मॅगझिनची ही पेपरलेस अभिनव कल्पना राबवून पर्यावरण वाचविण्यातील आपला सहभाग अधोरेखित केला आहे. या पुस्तकात फलटण असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटरच्या २०२२-२३ या कार्यकाळातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांचा मागोवा घेण्यात आला आहे.

बिल्डर्स असोसिएशनच्या या पुस्तकात सुरूवातीलाच असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यांची माहिती देण्यात आली आहे. असोसिएशनचे सचिव महेश साळुंखे यांनी मनोगत मांडले आहे. या मनोगतात त्यांनी असोसिएशनने २०२२-२३ मध्ये सदस्यांच्या व्यवसायवृध्दीसाठी केलेले प्रयत्न, वास्तु प्रदर्शन, असोसिएशनचे कामकाज, राबविलेले सामाजिक उपक्रम, अभ्यास दौरे, रक्तदान मोहीम, वृक्षारोपण, पालखी सोहळा, हेल्थ चेकअप कॅम्प, कोविड बुस्टर डोसचा कॅम्प, पोलीस कल्याण निधीस केलेली भरघोस आर्थिक मदत, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व इतर सेवाभावी कार्यक्रम, सण याबद्दल सांगितले आहे.

असोसिएशनचे चेअरमन राजीव नाईक निंबाळकर यांनी मनोगतात बिल्डर्स असोसिएशनमार्फत केले जाणारे सामाजिक काम, युवकांसाठी काम, महिलांसाठी व बांधकाम कामगारांसाठी राबविलेले उपक्रम याबद्दल माहिती सांगितली आहे. तसेच बिल्डर्स असोसिएशनला सहकार्य करणार्‍या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

त्यानंतर या पुस्तकात ‘फलटण एक प्रगतशील शहर’ या लेखात फलटणचा ऐतिहासिक वारसा व त्यानंतर फलटण शहराने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात केलेली प्रगती याचा आढावा घेण्यात आला आहे.

पुस्तकात पुढे बिल्डर्स असोसिएशनच्या २०२२-२३ पदग्रहण समारंभाची माहिती देण्यात आली आहे. बिल्डर्स असोसिएशनच्या सन २०२२-२३ या वर्षीचा पदभार चेअरमन म्हणून श्री. राजीव सुरेशराव नाईक निंबाळकर यांनी स्वीकारला. तसेच व्हा. चेअरमन म्हणून श्री. सुनील सस्ते, सचिव श्री. महेश साळुंखे व खजिनदार श्री. सचिन निंबाळकर यांची निवड केली आहे.

जालना येथील कालिका स्टील फॅक्टरी यांच्या सौजन्याने आणि निमंत्रणावरून बिल्डर्स असोसिएशन फलटण सेंटरचा अभ्यास दौरा व्यावसायिकद़ृष्ट्या अतिशय माहितीपूर्ण व नियोजनबध्द आयोजित केला होता. या दोन दिवसीय अभ्यास दौर्‍याची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.

बिल्डर्स असोसिएशनकडून २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. असोसिएशनने हा दिवस मुधोजी हायस्कूल येथे विद्यार्थी व बिल्डर्स असोसिएशनचे मेंबर यांच्यासमवेत योगगुरू श्री. अरुण येवले सर यांच्या मार्गदर्शनााली साजरा केला. या कार्यक्रमाची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.

जगातील १०० पेक्षा जास्त देश ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतात. या दिवशी विविध संस्था हजारो वृक्षांची लागवड करतात, पण त्यांचे संवर्धन योग्य प्रकारे न केल्याने त्यातील काहीच झाडे टिकतात. म्हणून बिल्डर्स असोसिएशन फलटण सेंटरने दरवर्षी १०० झाडांची लागवड करायची व त्यांचे योग्य रीतीने संवर्धन करायचे ठरविले आहे. त्याबद्दलही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीला फलटण मुक्कामी दरवर्षी ४ लाख वारकरी असतात. या वारकर्‍यांना बिल्डर्स असोसिएशन मोफत चहा, नाष्टा व फूड पॅकेट देते. याचीही माहिती पुस्तकात आली आहे. कोविड काळात बिल्डर्स असोसिएशनने हजारो नागरिकांचे शिबिर आयोजित करून मोफत लसीकरण केले आहे. त्याची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.

भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ १५ सप्टेंबर रोजी ‘इंजिनिअर्स डे’ साजरा केला जातो. फलटण सेंटरने यावर्षी ज्येष्ठ सेवानिवृत्त अभियंत्यांचा सत्कार ‘इंजिनिअर्स डे’ रोजी केला. त्याबद्दल पुस्तकात माहिती आहे.

बिल्डर्स असोसिएशने २०२२-२३ या आपल्या कार्यकाळात आयोजित केलेले रक्तदान शिबिर, हेल्थ चेकअप कॅम्प, वास्तू प्रदर्शन, सदस्यांसाठी अभ्यास दौरे, सण, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम यांची सविस्तर माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.

‘स्मृतीगंध’ हे ई-मॅगझिन नागरिकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास बिल्डर्स असोसिएशनचे चेअरमन राजीव नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.


Back to top button
Don`t copy text!