प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांच्या ‘मी भारतीय’ कवितासंग्रहाचे प्रकाशन


दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२२ । सातारा । भारतीय संविधान हीच आपली ओळख आहे.संविधानाच्या स्वप्नातला गाव कसा असणार आहे ती वाट आहे भारतीय संविधान. भारतीय संविधान हा देशाला चांगल्या मार्गाने कसे जावे हे सांगणारा जी.पी.एस असून हा या जी.पी.एस.मधून मार्गदर्शन करणारा  आवाज हा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. डॉ.सुभाष वाघमारे यांचा ’मी भारतीय ‘हा कवितासंग्रह बाबासाहेब यांचा आवाज आहे.  पूर्वीच्या काळी व्यवस्थेने अनेकाना लॉकडाऊन लावला. सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षाचा लॉकडाऊन तोडला आणि आपल्याला माणुसकीचे गाणे दिले.सुभाष वाघमारे यांची कविता ही माणुसकीचे गाणे आहे.माणुसकीची आर्त हाक आहे.माणूस जोडला कि देश जोडला जातो.माणूस जोडण्यासाठी देश जोडो हे महत्वाचे आहे. आम्ही भारताचे लोक हे सर्व घडवणार आहोत.अनेक देशांची संविधाने ही व्यक्तीला व देवांना अर्पण केली आहेत,पण हे भारतीय संविधान आम्हाला अर्पण केले आहे. आम्ही भारतीय जे काही भले बुरे करणार आहोत,तसाच देश घडणार आहे. म्हणूनच संविधानानुसार देश घडविण्याची जबाबदारी आपली  आहे.हे संविधान इतर कोणत्याही देशाची कॉपी नाही.६० पेक्षाही जगातली संविधाने आपल्या संविद्धान निर्मात्यांनी अभ्यासली आहेत .बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध,फुले,कबीर यांच्यातून येणारा देशी मूल्यविचार व आत्मीयता घेऊन संविधान निर्माण केले.चुकीची मुल्ये पेरणारी मनुस्मृती जाळून बाबासाहेबांनी संविधानाचा स्वीकार केला आहे. संविधानाचा मार्ग हाच देश एकात्म ठेवणार आहे ‘’असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त केले.ते येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये संविधान दिन  समारंभात प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांच्या ‘मी भारतीय’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे उपस्थित होते.या वेळी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार विजेते रोहित बनसोडे यांची विशेष उपस्थिती होती. मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.शिवाजी पाटील,उपप्राचार्य डॉ.रोशन आरा शेख, उपप्राचार्य डॉ. रामराजे माने देशमुख,प्रा.चंद्रकांत जडगे,एकनाथ पोवार,मुख्याध्यापिका सुनिता वाघमारे,साहित्यवेल प्रकाशनचे सुमित वाघमारे,सोनम पवार इत्यादी उपस्थित होते. उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत,संविधान दिन निमित्ताने,प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांचे मार्गदर्शनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आपल्या भारतीय संविधानाचे महत्व सांगताना श्रीरंजन आवटे पुढे म्हणाले की ‘’अमेरिकेन लोकशाही जुनी असूनही तिने स्त्रियांना स्वातंत्र्य दिले नाही आपल्या संविधानाने १९५० ला सर्वांना स्वातंत्र्य दिले आहे.अमेरिका व  युरोपमध्ये स्त्रियांना मताच्या अधिकारासाठी लढा द्यावा लागला. वाद ,प्रतिवाद व संवाद यातून भारतीय संविधान उभे राहिले आहे.भारतीय संविधानाने एकाच वेळी प्रत्येकाला अधिकार दिला राजकीय लोकशाही अस्तित्वात आणली. बाबासाहेब यांनी अंतर्विरोध दाखवून दिले. बाबासाहेबांनी देशात सामाजिक व आर्थिक लोकशाही नाही हे दाखवून दिले. आर्थिक दरी मोठी.असंघटीत क्षेत्रात आज रुपये वीस प्रतिदिन मिळवणे अवघड आहे.आर्थिक विषमता देशात मोठी आहे .हर घर तिरंगा ही घोषणा नुसती उपयोगी नाही .इथे अनेकांना घर नाही .मेरा भाषण ही मेरा शासन है हे योग्य नाही. विभूतीपूजा हा भारतात जडलेला सर्वात मोठा रोग आहे. विभूती पूजेने लोकशाहीचे अधःपतन होते. अर्योन्का साथ सबका विकास हे योग्य नाही. हुकुमशाही,आणीबाणी ही देशाला घातक आहे. मी म्हणजेच भारत असे म्हणणाऱ्या सत्ता माणसाच्या हातात देणे योग्य नसते. लोकशाही म्हणजे नुडल्स आहेत का ? अस्तित्वात असलेली लोकशाही आणि आदर्श हुकुमशाही अशी तुलना योग्य नाही. गांधीजींचा अंत्योदय हा विचार खूप महत्वाचा आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता विचार लोकांना समजला पाहिजे. बहुमत असले म्हणून लोकांचा जीव जाणार असेल तर बहुमत निर्णय योग्य नसते.बहुमत आज झुंडशाही होताना दिसते. स्वातंत्र्य,समता,बंधुता,धर्मनिरपेक्षता ही गुणात्मक मुल्ये आहेत. धर्मनिरपेक्षतेचे गैरसमज दूर करायला हवेत. कलम २५ मध्ये सद्सद विवेकाचे स्वातंत्र्य दिले आहे ते  धर्मनिरपेक्ष आहे. राज्यसंस्था कोणत्याही धर्माला महत्व देत नसावी.भारतीय संविधान धर्मात सकारात्मक हस्तक्षेप करते.अल्पसंख्याक यांचे लाड केला जातो,हे खोटे आहे. वंचित समुदायांना आरक्षण हवेच .आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही. ती सामाजिक न्यायाची तरतूद आहे. राष्ट्रपतींना जगन्नाथाच्या मंदिरात प्रवेश देण्यापासून का रोखले जाते ? अन्याय सामाजिक आधारावर केले जात आहेत.  नफा हे भांडवलशाहीचे मुलभूत तत्व आहे.त्यामुळे त्यांची मांडणी वेगळी असते. माध्यमे राजकर्त्यांची बटिक होता कामा नयेत. ज्याची लोकांना खरी गरज आहे ,त्याचे उत्पादन करणे ही राज्यसंस्थेचे काम आहे. समाजवाद हे तत्व महत्वाचे आहे. भांडवलशाही ही मुठभर लोकांचे प्रतिनिधित्व करते. कोरोना काळात जगातील मोठी संपत्ती मुठभर भांडवलदारांच्या  घरात गेली. गरिबांचे पैसे भांडवलदाराच्या झोळीत ओतले कुणी त्याचा शोध घ्यायला हवा. आपल्या भारतीयांच्या स्वप्नाचे मरण कुणी निर्माण केले हे देखील शोधले पाहिजे असे ते म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की ‘’ प्रत्येक भारतीयांच्या दृष्टीने हा दिवस खूप महत्वाचा आहे. स्वतंत्र भारताच्या नागरिकांचा  मूल्यांच्या दृष्टीने उपयोगी असणारा  संविधान हा आपला राष्ट्रग्रंथ आहे,.आपल्याला मिळालेल्या संधी या भारतीय संविधानाने दिल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वोत्कृष्ट घटना तयार केली. संविधानाने भारतीय झाल्याची जाणीव करून दिली.’मी भारतीय’ या कविता संग्रहात  माणूस हा केंद्रबिंदू आहे. वैचारिक जाणीवा देणारा हा काव्यग्रंथ आहे. झुंजार माणसा झुंज दे, संविधानाचा प्रकाश तू या सारख्या कविता स्वावलंबी ,व चांगल्या जीवनाच्या आकांक्षा घेऊन या कवितासंग्रहात आल्या  आहेत. भारतीय अस्मिता निर्माण करणारी व समताधिष्ठित व्यवस्था निर्माण करण्यासाठी लिहिलेली कविता असल्याचे त्यांनी सांगितले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.शिवाजी पाटील यांनी केले. तसेच संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन त्यांनी घेतले. डॉ.रोशनआरा शेख यांनी परिचय करून दिला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मिळवणाऱ्या रोहित बनसोडे यांनी आपले आत्मकथन करून २०१७ पासून केलेल्या वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कामाची माहिती सांगितली. आभार प्रा,डॉ.संजयकुमार सरगडे यांनी मानले तर डॉ.विद्या नावडकर यांनी सूत्र संचालन केले. या कार्यक्रमास मराठी ,एन.सी.सी.,समान संधी केंद्र ,इंग्रजी ,राज्यशास्त्र ,छत्रपती शिवाजी कॉलेज विद्यार्थिनी वसतिगृहातील विद्याथिनी व विद्यार्थी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!