स्थैर्य, मुंबई, 4 : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र- आत्मनिर्भर भारत‘ या पुस्तकाचे आज मुंबई भाजपा कार्यालय, वसंत स्मृती, दादर मुंबई येथे विमोचन करण्यात आले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, संघटन मंत्री विजय पुराणिक यावेळी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्याकाळात भाजपच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या सेवाकार्याचा आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला. या कार्यक्रमानंतर एका छोटेखानी कार्यक्रमात हे प्रकाशन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात देशातील गरीब, वंचितांपासून ते उद्योगांपर्यंत सर्वांना मदत करण्यासाठी आत्मनिर्भर अभियान जाहीर केले. हे अभियान नेमके काय, या पॅकेजमधून कोण आणि कसा लाभान्वित होणार, महाराष्ट्राला या पॅकेजमधून काय मिळणार याचे अतिशय सोप्या शब्दात त्यांनी या पुस्तकात विश्लेषण केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संकेतस्थळावर सुद्धा हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात आले आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री आशिष शेलार, विनोद तावडे, खा. मनोज कोटक, रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड आणि इतर नेते उपस्थित होते.