वार्षिक नियतकालिक शिवविजय २०२१-२२ चे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑक्टोबर २०२२ । सातारा ।  ‘‘महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने छोडो भारत चळवळ सुरु झाली.’करो या मरो’ या घोषणेने सारा भारत एकवटला. गांधी नेहरू या प्रमुख नेत्यांना अटक झाली.इंग्रजांना वाटले की आता नेत्यांना अटक केली म्हणजे हे
आंदोलन बंद होईल पण असे झाले नाही. लोकांची गावागावात जन आंदोलने झाली.ब्रिटीशांची सत्ता खिळखिळी करून टाकण्यासाठी अनेक ठिकाणी उठाव झाले.मी स्वतः शाळेतील पंचम जॉर्जचा फोटो बाहेर आणून फोडून जाळून टाकला. त्यावेळी माझ्या खांद्यावर फौजदाराने बेंडगिरी दिलेल्या फटक्याने त्याची अंगठी माझ्या मानेच्या मांसातघुसली. तिथे पाच पंचवीस जणानी गोंधळ केला. या गोंधळाचा फायदा घेऊन मी पलायन केले. १३-१४ वर्षाच्या वयात आमच्या मनात स्वातंत्र्याचे वारे भरले होते. तिरंगा घेऊन वडूजच्या मामलेदार कचेरीवर ९ सप्टेबर १९४२ ला आंदोलन झाले. जयरामस्वामी ,परशुराम घार्गे,आम्ही जवळपास दीड हजार लोक होतो.तिथे मामलेदार अंकली याने फौजदार बेंडगिरीला सांगून बंदोबस्त ठेवला होता.परशुराम घार्गे व अनेक तरूण तिरंगा घेऊन पुढे गेले.
वडूजच्या मामलेदार कचेरीवर झेंडा लावण्यास जाणाऱ्या तरुणावर बेछूट गोळीबार केला.गर्दी पांगली. पण धाडसाने तिरंगा लावण्यासाठी जाणारयातील ९ कार्यकर्ते हुतात्मा झाले. अनेकजण जखमी झाले.माझ्या पायाला गोळी लागली. त्यावेळी औंध संस्थानात आम्हावर उपचार केले..ब्रिटिशांना औंधच्या संस्थानात इंग्रजांना आम्हाला पकडण्यास मज्जाव होता. असे अनेकांनी देशासाठी आपले जीव दिले ,कोणी तारा तोडल्या ,कुणी खजिना लुटला, कुणी कचेऱ्या जाळल्या.इंग्रजी सत्ता उलथून टाकण्यासाठी अहिंसात्मक आंदोलन जसे झाले तशी क्रांतिकारकांनी प्रत्यक्ष व भूमिगत राहून लोकांना उठवले .जय हिंद,भारत माता की जय,वंदे मातरम या आमच्या घोषणा होत्या. १९४२ नंतर पाच वर्षांनी स्वातंत्र्य मिळाले पण आजची राजवट आणि बघितली तर असे वाटते की महात्मा गांधीनी स्वातंत्र्य कशासाठी मिळवून दिले हे लोकांना अजून कळत नाही ‘’ अशी खंत सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णा बंडू सापते[जाधव ] यांनी व्यक्त केली .ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभाग ,एन.सी.सी.शिवविजय संपादन समिती व विवेक वाहिनी विभागाने आयोजित केलेल्या मुलाखत कार्यक्रमात बोलत होते.मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे हे मुलाखत घेत होते. यावेळी अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक वारसदार संघटनेचे सरचिटणीस विजय देशपांडे ,जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, छत्रपती शिवाजी कॉलेजचे माजी प्राचार्य आर.डी.गायकवाड, उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे, उपप्राचार्य डॉ.रामराजे देशमुख ,उपप्राचार्य डॉ.रोशनआरा शेख,लेफ्टनंट प्रा.केशव पवार विविध विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांचे मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती सांगताना स्वातंत्र्य सैनिक सापते म्हणाले की महात्मा गांधीजीना आपल्या राजवटीचा उपयोग जनतेच्या सुखासाठी व्यवस्थित व्हावा असे वाटत होते पण स्वातंत्र्यानंतर केवळ गांधीजींचे नाव आणि शब्द फक्त तोंडात घेतात पण आचरण तसे करीत नाहीतएक हाती सत्तेची राजवट चांगली चालते असेही ते
म्हणाले. स्वातंत्र्य सैनिकांना केवळ अमृत महोत्सव असल्यामुळे किंमत दिली जातेय, २६ जानेवारी व १५ ऑगस्ट या दोन दिवशी फक्त आम्हाला बोलावले जाते इतरवेळी आमच्या अडचणी काय याची साधी दखलही कुणी घेत नाही ही अस्वस्थता त्यांनी व्यक्त केली.सापते यांनी विद्यार्थ्यांना कापसाच्या पेळूने चरख्यावर सुत कसे तयार केले ते दाखवले. वर्ध्याच्या आश्रमात जाऊन ८० नंबरचे सुत काढल्याबद्दल त्यांना शाबासकी देण्यात आली होती.खादीसाठी सुत काढण्याचे प्रशिक्षण घेतल्यावर त्यांनी खटाव तालुका खादीमय करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. ‘भारत माता की…’अशा तीन वेळा घोषणा दिल्याने विद्यार्थ्यांनी देखील त्याच जोशात ‘जय’ असे म्हणून त्यांना प्रतिसाद दिला. अखिल भारतीय स्वातंत्र्यसैनिक वारसदार संघटनेचे चिटणीस विजय देशपांडे यांनी आपण छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी असून प्राचार्य शंकरराव उनउणे असताना आम्हाला खूप प्रेम मिळाल्याचे सांगितले.एन.सी.सी च्या ए,बी,सी परीक्षा पास झाल्याचे त्यांनी सांगितले. मी साताऱ्यातील स्वातंत्र्य सैनिक जगन्नाथराव देशपांडे यांचा मुलगा. मी मुंबईला सब इन्स्पेक्टर होतो त्यावेळी त्या कार्यालयात मला लाच देण्यात आली.त्यावेळी मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असल्याने मी लाच घेतली नाही. ते पैसे न घेता ते बँकेत ठेवले. २८ वर्षाचे वय असताना पोलीस खात्यातील भ्रष्टाचार शोधून दिला.त्यासाठी त्यांनी एस.एम.जोशी,भाई वैद्य,पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांचेशी
संपर्क केल्याचेही सांगितले. शेवटी असुरक्षित वाटल्याने व लाचखोर माझ्या जीवितास धोका करतील असे एकजणाने सांगितले. शेवटी कुत्र्यांच्या हातून मरण यावे ही माझी इच्छा नव्हती त्यामुळे मला राजीनामा द्यावा लागला..जकातवाडी परिसरात गुंडगिरी मोडून काढण्यास लहान मुलांच्या करवी त्यांच्यावर होणारे अत्याचार स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिण्यास प्रवृत्त करून जिल्हा पोलीस अधिक्षक करवी गुंडगिरी कशी मोडून काढली ही घटना सांगून विद्यार्थ्यांनी आपल्याला भोवताली दिसणाऱ्या बेकायदेशीर घटना मोडून काढल्या पाहिजेत हेच खरे
देशकार्य आहे असे ते म्हणाले. नोकरीचा राजीनामा देऊन मी छोटी मोठी कामे करून उदरनिर्वाह करीत असलो तरी लाच घेतली नाही आणि लाच घेणाऱ्या कंपूला प्रतिबंध करण्यासाठी मी लढा दिला हे समाधान मला आज मोठे आहे असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी बारकाईने त्यांचे भाषण ऐकले.अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. कार्यक्रमाच्या सुरवातीस स्वातंत्र्य सैनिक अण्णा सापते, विजय देशपांडे व जिल्ह्याचे माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे यांना सन्मानचिन्ह देऊन महाविद्यालयाच्या तर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. यांच्या हस्ते कॉलेजच्या
शिवविजय २०२१ -२२ वार्षिक अंकाचे प्रकाशन झाले. स्वातंत्र्य सैनिक अण्णा सापते यांनी स्वतः तयार केलेले चरख्यावर तयार केलेले सुताचे हार निवडक विद्यार्थी व प्राध्यापक यांना घातले. प्रास्ताविक व स्वागत मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी केले. आभार लेफ्टनंटप्रा.केशव पवार यांनी मानले.सूत्रसंचालन डॉ.विद्या नावडकर यांनी केले. मराठी विभागातील डॉ.कांचन नलावडे ,डॉ.संजयकुमार सरगडे,प्रा.प्रियांका कुंभार,प्रा.श्रीकांत भोकरे ,एन.सी.सी.,मराठी ,विवेक वाहिनीचे विद्यार्थी यांनी कार्यक्रम आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!