
स्थैर्य, पुणे दि.19 : बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा अग्रणी बँक व जिल्हयातील सर्व बँकांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या पुणे जिल्हयाच्या सन 2020-21 या वर्षाच्या 80 हजार 248 .12 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखडयाचे प्रकाशन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डीआयसीचे मुख्य व्यवस्थापक रेंदाळकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब पडघलमल, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नितीन शेळके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आनंद बेडेकर व सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम यांनी या पत पुरवठा आराखडयाची वैशिष्टये सांगताना हा पत आराखडा 80 हजार 248 .12 कोटी रुपयांचा असून मागील वर्षापेक्षा तो 32 टक्क्यांनी अधिक आहे. प्राथमिकता क्षेत्रासाठी 40 हजार 248.12 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती एकूण पतपुरवठयाच्या 50 टक्के असल्याचे व कृषी कर्जासाठी 7 हजार 351.52 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे तसेच त्याचे प्रमाण प्राथमिकता कर्जांपैकी 18 टक्के एवढे असून कृषी कर्जामध्ये प्रामुख्याने सेंद्रीय शेती,फुले व फळबाग लागवड, हरितगृह, कृषि निर्यात योजना, कृषि यांत्रिकीकरण, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान तसेच शेतीपुरक व दुय्यम योजनांचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगितले.
या पत पुरवठा आराखडयात सूक्ष्म, लघु व मध्यम ( एम.एस.एम.इ) साठी 25 हजार 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्वयंरोजगार योजनांसाठी, शैक्षणिक कर्जासाठी, गृहकर्जासाठी, छोटया व्यवसायासाठी 7 हजार 546.60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पतपुरवठा आराखडयामध्ये व्यापारी बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह 34 बँकांच्या 1 हजार 928 शाखांचा समावेश आहे.
जिल्हयातील सर्व बँकांनी 31 मार्च 2020 अखेर प्राथमिकता क्षेत्रात रुपये 31 हजार 222.72 कोटी रुपयांचे मागील आर्थिक वर्षात ( 2019-20) वाटप करुन आराखडयाची 83 टक्के उदिष्ट पुर्ती केलेली आहे. या उदिष्ट पुर्तीसाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व सर्व बँकांचे अभिनंदन करुन चालू आर्थिक वर्षात अधिक गतीने उद्दीष्ट पूर्ण होईल, असा विश्वासही जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केला.