दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । मुंबई । रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पुल दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून राज्यात अनेक साकव वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे लक्षात येत असल्याने साकवांचे रूपांतर पुलांमध्ये करण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याबाबत सदस्य योगश कदम यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार, भास्करराव जाधव यांनीही सहभाग घेतला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण म्हणाले, दापोली तालुक्यातील पूल वाहतुकीसाठी सुरक्षित व्हावा यासाठी नव्याने निधीची तरतुद करण्यात येईल तसेच राज्यात अशाच प्रकारे साकवांचे रूपांतर पूलांमध्ये करण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही श्री.चव्हाण यांनी स्पष्ट केले.