दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑगस्ट २०२२ । मुंबई । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ( सार्वजनिक उपक्रम) रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य सुनील प्रभू आणि इतर सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गाचे सर्व काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण केले जाईल. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी २५ ऑगस्टपर्यंत या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल. त्यानंतर पाहणी दौरा केला जाईल.
मुंबई-गोवा महामार्गावरील काम गतीने होण्यासाठी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार केला जाईल. परशुराम घाट आणि कशेडी घाटातील कामकाज अधिक सुरक्षित होण्यासाठी टेरी संस्थेचा सल्ला घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. याबाबतच्या चर्चेत सदस्य सर्वश्री भास्कर जाधव, राजन साळवी, रवींद्र वायकर, नितेश राणे यांनी सहभाग घेतला.