धोकादायक आणि जीर्ण पूलांची कामे करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०१ जानेवारी २०२२ । मुंबई । राज्यातील धोकादायक आणि जीर्ण पूलांची कामे करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून, नव्याने उभारण्यात येणारे पूल आणि दुरुस्ती करावयाच्या पुलांच्या कामांचे नकाशे, आराखडे महिनाभरात विभागाकडे सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिले.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील धोकादायक व जीर्ण पुलांचा विषय उपस्थित झाला होता. त्या अनुषंगाने राज्यातील अशा सर्व पुलांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे यांचेसह नांदेड, औरंगाबाद, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे मंडळाचे मुख्य अभियंते आणि अधिक्षक अभियंते उपस्थित होते.

राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर असलेल्या ज्या पुलांच्या कामाकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे ते पूल आणि ज्या पुलांची कालमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा सर्व पुलांचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याच्या सूचना यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. नवीन पूल बांधत असताना त्या-त्या भागातील सर्वाधिक पर्जन्यमान लक्षात घेणे गरजेचे असून पुलाची उंची पूर पातळीपेक्षा अधिक असेल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पुलाचे डिझाईन करत असताना बंधारा टाईप पूल बांधल्यास त्यामाध्यमातून जलसंधारणाचा हेतू देखील सफल होणार असल्याने त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.

पुढील काळात पुलांची उभारणी करताना त्यात सौंदर्यदृष्टी, वापरकर्त्यांसाठी सुविधा यासह पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विचार करावा आणि सौरउर्जेची निर्मिती करण्यासारख्या संकल्पनेवरही अभियंत्यांनी अभ्यास करण्याच्या सूचना देऊन रस्ते किंवा पूल बांधणी करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी केले. कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच फायबर कॉंक्रिट तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक विभागात किमान एका पुलाची उभारणी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली. कोकणात अतिवृष्टी, महापुरामुळे नुकसान झालेल्या पुलांची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.


Back to top button
Don`t copy text!