निसर्गाला पूरक अशा पद्धतीनेच विकास योजनातील नव्या इमारतींची रचना आवश्यक – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२१ । नांदेड । विविध विकास योजनेंतर्गत शासन जनतेच्या कल्याणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देते. या सोयी-सुविधांच्या नियोजनासाठी, आरेखन व वास्तू स्थापत्यासाठी पुरेसा वेळही दिला जातो. तथापि यात आता नवीन कालसुसंगत व पर्यावरणपूरक इमारतींच्या रचनांवर अधिक भर देऊन ग्रीन बिल्डींगची संकल्पना वृद्धींगत करण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे आकारास येऊ घातलेला बांबू प्रकल्प, शंभर खाटांचे रुग्णालय, ग्रामीण भागात प्रस्तावित करण्यात आलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि जलसिंचनाच्या दृष्टिने आवश्यक असलेल्या जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या विकास कामांबाबत त्यांनी संबंधित विभागाकडून आढावा घेतला. या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भोकर येथे उभारण्यात येणाऱ्या शंभर खाटांचे रुग्णालय हे अधिकाधिक निसर्गपूरक कसे करता येईल यावर अभियंत्यांनी भर दिला पाहिजे. पुरेसा प्रकाश, मोकळी हवा, उष्णतेला कमी करण्यासाठी निसर्गपूरक रचना ही बदलत्या पर्यावरणपूरक इमारतीची परिभाषा आहे. अलिकडच्या वर्षात आपोलो व अन्य हॉस्पिटलनी अत्यंत कुशलतेने त्यांचे वास्तुस्थापत्य, प्लॅन्स तयार केले आहेत. अशा धर्तीवर शासनाच्या हॉस्पिटलच्या इमारती का असू नयेत असा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी वेळप्रसंगी याच्या नियोजनाचे काम इतर वास्तुशास्त्रज्ञांकडून करुन घेण्याचे निर्देश दिले.

नारवट येथील बांबू प्रकल्पाचा आढावा त्यांनी घेतला. या प्रकल्पाची पायाभूत नियोजनाच्यादृष्टिने सर्व पूर्तता झाली असून प्रकल्पातील हस्तकला, प्रशिक्षण, प्रदर्शन, विक्री केंद्र इमारतीचा पहिला टप्प्याचे काम लवकरच सुरू करू असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक कामातील गुणवत्ता ही राखली गेलीच पाहिजे. इमारतीच्या वास्तुस्थापत्यामध्ये कोणत्याही त्रुटी असता कामा नयेत. याबाबत प्रत्येक विभाग प्रमुखांनी दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!