भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२६: भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहाचे नूतनीकरण तसेच नवीन विश्रामगृहाचा आराखडा तयार करून तातडीने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत. तसेच या दोन्ही जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांचे प्रस्तावही पाठविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे दिले.

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गासंदर्भात आज श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजू कोरेमोरे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, सचिव (बांधकामे) अनिलकुमार गायकवाड, उपसचिव बस्वराज पांढरे, मुख्य अभियंता के.टी पाटील हे उपस्थित होते. तसेच नागपूर विभागाचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी गोंदियामधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम, कोहमारा-गोंदिया-बालाघाट रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल, गोंदिया शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचे दर्जाउन्नतीकरण, कामठा-कालीमाटी-आमगाव रस्त्याची दुरुस्ती, भंडारा जिल्ह्यातील नाथा डोंगरी येथील पुलाचे सक्षमीकरण, खापा ते भंडारा मार्ग चौपदीकरण, लाखाणी तालुक्यातील पालांदूर येथील बाह्यवळण मार्ग, तुमसर बाह्य वळण मार्ग, रामटेक-मोहाडी रस्त्याचे बाह्यवळण मार्ग, वर्टीस्थानक येथील रेल्वे पुलाचे काम, गोंदिया जिल्ह्यातील केसुरी बाह्यवळण मार्ग, पांढरी-साकोली-धापेवाडा रस्त्याचे उन्नतीकरण आदी कामांचा आढावा घेण्यात आला.

श्री. चव्हाण म्हणाले की, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जी कामे सुरू आहेत, ती तातडीने पूर्ण करावीत. तसेच लोकप्रतिनिधींनी मागणी केलेल्या कामांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत जेणेकरून अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात येईल. भंडारा जिल्ह्यातील जे रस्ते खाणींशी जोडले जातात, अशा रस्त्यांचे कामे ही सिमेंट क्राँक्रिटने करण्यासंदर्भातही प्रस्ताव पाठवावेत.

खासदार श्री. पटेल यांनी दोन्ही जिल्ह्यातील रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी केली. तसेच सर्व कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरणाचे तसेच भंडारातील प्रशासकीय इमारतीचे कामही तातडीने सुरू करावे, अशी मागणी यावेळी केली.

आमदार सर्वश्री. कारेमोरे व श्री. चंद्रिकापुरे यांनीही रस्त्यांच्या कामांना निधी देऊन तातडीने कामे पूर्ण करण्याची मागणी केली.


Back to top button
Don`t copy text!