दैनिक स्थैर्य । दि. ०५ जानेवारी २०२३ । हिंगोली । सध्या देशात सरकारी उद्योगसंस्थाच्या खाजगीकरणाची लाटच आली आहे, अनेक सरकारी प्रकल्प मागील काही काळात खाजगीकरणाकडे वळले आहेत, त्याचीच झळ आता महानिर्मिती, महापारेशन व महावितरण या तीन महत्वाच्या सरकारी वीज कंपन्यांना पोहोचली आहे, राज्य सरकारने या तिन्ही कंपन्यांच खाजगीकरण करून या कंपन्या बड्या उद्योगपतींना सोपवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा फटका भविष्यात वीज कंपनी कर्मचारी, वीज उपभोक्ता, शेतकरी, लघू उद्योजक, किरकोळ व्यापारी याना बसणार आहे, म्हणून वीज कर्मचाऱ्यांनी वेळीच सावध होत वीज कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने दि. ३ जानेवारी ते ६ जानेवारी असा ७२ तासांचा संप पुकारला आहे त्यांच्या निर्णयाचे स्वागत करीत संभाजी ब्रिगेडने वीज कर्मचारी संघर्ष समितीस जाहीर पाठींबा दिला आहे.
सदर संप हा सरकारच्या खाजगीकरणा विरोधात असून वीज कर्मचाऱ्यांद्वारे सदर काळात कोणतेही वीज शटडाऊन घेण्यात आलेले नाही त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्यांमुळे कोणीही पॅनिक होऊ नये तसेच वीज कर्मचाऱ्यांनी ही सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने उभे रहावे व सरकारनेही वीज कर्मचारी संघर्ष समितीच्या मागण्या मान्य करून होणाऱ्या त्रासातून वीज कर्मचारी व जनता यांना मुक्त करावे असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍड. मनोज आखरे यांनी संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केले आहे.