तंबाखू सेवनाविरोधात लोकचळवळ हवी – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची अपेक्षा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । तंबाखू सेवनाच्या व्यसनांविरोधात लोकचळवळ उभारायला हवी. याबाबतच्या कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी. या प्रक्रियेत जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले

सार्वजनिक आरोग्य विभाग, एनएचएम आणि टाटा मेमोरियल सेंटरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आवाहन केले. यावेळी स्टेट लेव्हल यूथ टोबॅको सर्व्हेचे – महाराष्ट्र फॅक्ट शीटचे प्रकाशन श्री. टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.

टाटा मेमोरियल सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाला श्री. टोपे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे महासंचालक डॉ. एल. स्वस्तिचरण, डॉ. राजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

श्री टोपे यांनी सांगितले की, शालेय विद्यार्थी विशेषतः महिला आणि मुलींमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. तंबाखू सेवन आरोग्याला हानिकारक आहे, याबाबत लोकांत जाणिव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तंबाखू सेवन आरोग्याला धोकादायक आहे याची जाणीव असूनही तंबाखू सेवन केले जाते. तंबाखूजन्य उत्पादनाची मागणी कमी व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग , पोलीस, अन्न आणि औषध प्रशासन आणि शालेय शिक्षण विभागाने एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे.

यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणामाबाबत मुलांना शिक्षित करायला हवं. रंगपंचमीला धोकादायक रंगाचा वापर करु नये, ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी फटाके वापरु नये याबाबत मुलांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण केली गेली. त्यामुळे फटाके आणि रंगाचा वापर कमी झाला. त्याचप्रमाणे तंबाखूबाबत मुलांना शिक्षित करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ साधना तायडे, उपसंचालक डॉ पद्मजा जोगेवार, टाटा मेमोरियल सेंटरचे राजेंद्र बडवे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ. शर्मिला पिंपळे यांनी सूत्रसंचालन तर सहाय्यक संचालक डॉ. संजीव कुमार जाधव यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!