जिल्हा रुग्णालय येथे जन औषधी दिवस साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ मार्च २०२२ । सातारा । पंतप्रधान भारतीय जन-औषधी परियोजना – जन औषधी दिवस खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे साजरा करण्यात आला.

प्रथम सत्रात जिल्हधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते दीप-प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केली. जेनेरिक औषधे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवणे, महिलांसाठी माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स पुरविणे, जास्तीत जास्त जन औषधी केंद्रे स्थापित करणे व त्यायोगे जास्तीत जास्त सुशिक्षित नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे ही चार उद्दिष्टे त्यांनी यावेळी सांगितली.

जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जेनेरिक औषधे स्वस्त दरात असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविला जात असून त्या अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या ११००० रुग्णांना मोफत जेनेरिक औषधांचे वाटप करण्यात येणार असल्यचे त्यांनी सांगितले.

द्वितीय सत्रामध्ये खासदार श्री. पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले. आपल्या खुमासदार भाषण शैलीत जनतेशी संवाद साधताना ते म्हणाले, पंतप्रधान भारतीय जन औषधी परीयोजने मार्फत कमीत कमी किंमतीत उच्च दर्जाची, तितकीच उपयोगी, महत्वाची औषधे सर्व-सामान्य रुग्णांना मिळत आहेत.

कार्यायक्रमा दरम्यान काही लाभार्थ्यानीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सातारा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सहकार्य लाभले. यावेळी डॉ. राजेश गायवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सुभाष कदम अति. जिल्हा शल्यचिकीत्सक, सातारा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील, डॉ. सुनील सोनवणे, डॉ. राहुल जाधव, रुग्णालयातील अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!