दैनिक स्थैर्य । दि. २९ सप्टेंबर २०२२ । सातारा । भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या अर्थसहाय्यातून आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या 250व्या जयंतीच्या स्मरणार्थ त्यांचे कार्य व संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे या उद्देशाने ‘महिला सक्षमीकरणावर’ शालेय मुलांची ‘जनजागृती रॅली’ व ‘व्याख्यान’ जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा या कार्यालयामार्फत नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
जनजागृती रॅलीचा प्रारंभ जिल्हा परिषद इमारती समोरील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपासून झाली. रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या जनजागृतीमध्ये महिला सक्षमीकरणासह वाचन संस्कृतीचा ही उद्घोष व्हावा या उद्देशाने छानपणे सजवलेल्या आणि भारतीय संविधानाची प्रत व महापुरुषांच्या ग्रंथांचा समावेश असलेल्या ‘ग्रंथदिंडी’चे उद्घाटन आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख सचिन प्रभुणे यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
‘राजा राममोहन रॉय यांचे महिला सक्षमीकरणातील योगदान व सद्य:स्थिती’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी भारतीय समाजात मानवतावादी विचारांची प्रतिष्ठापना करुन समाज सुधारण्याची सुरुवात राजा राममोहन रॉय यांनी केली. धर्मांतील अनिष्ट व क्रुर प्रथांना प्रखर विरोध करुन स्त्री सुधारणांची मुहर्तमेढ त्यांनी रोवली असे प्रा. निरंजन फरांदे यांनी सांगितले.
व्याख्यान कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, प्रसिध्द वक्ते प्रा. श्रीधर साळुंखे, ज्येष्ठ कवी प्रदीप कांबळे, राजा राममोहन रॉय चरित्र अभ्यासक पंकज कुलकर्णी, नगर वाचनालयाचे कार्यवाह वैदही कुलकर्णी आदी उपस्थित होते.