दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । सातारा । ऐतिहासिक गोडोली तळे सुशोभीकरण करून पर्यटक व नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण करणे तसेच किल्ले अजिंक्यताराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून रस्त्याच्या कडेला पर्यटकांसाठी सिटिंग पॉईंट व सुशोभीकरण करणे आवश्यक असून या दोन्ही कामांसाठी पर्यटन खात्याकडून भरीव निधी द्या, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्रमानिमित्त मंत्री आदित्य ठाकरे सातारा दौऱ्यावर आले असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
गोडोली तळे सुशोभिकरण व अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या निधीसंदर्भाने चर्चा केली. गोडोली तळे हे सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून या ऐतिहासिक तळ्याला असंख्य पर्यटक भेट देत असतात. तसेच तळे पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने भेट देत असतात. तळ्याचे सुशोभिकरण करून पर्यटक व नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह व इतर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव सातारा जिल्हा नियोजन समितीमार्फत राज्याच्या पर्यटन विभागाकडे सादर करण्यात आला असून हा प्रस्ताव तातडीने मंजूर करून गोडोली तळे सुशोभिकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार भाेसले यांनी मंत्री ठाकरे यांच्याकडे केली.
किल्ले अजिंक्यताराकडे जाणारा रस्ता अरुंद असून पर्यटकांच्या आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण करणे आवश्यक आहे. तसेच किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला सातारा नगर परिषदेने पर्यटकांसाठी ठिकठिकाणी सिटिंग पॉईंट्स तयार केलेले आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाबरोबरच रस्त्याच्या कडेने सुशोभिकरण करणे आवश्यक असून यासाठी लागणार निधी पर्यटन खात्याकडून उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी आमदार भाेसले यांनी मंत्री ठाकरे यांच्याकडे केली. या दोन्ही मागण्यांबाबत मंत्री ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून दोन्ही कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी आमदार भाेसले यांना दिली.