खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १८: खत उत्पादक कंपन्यांनी गेल्या काही दिवसात खताच्या किंमतीत वाढ केली असून त्यामुळे पडणारा बोजा ध्यानात घेऊन शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केंद्रीय कृषीमंत्री मा. नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय खते व रसायने मंत्री मा. सदानंद गौडा यांच्याकडे पत्राद्वारे केली.

मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी या मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेले वर्षभर कोरोना महासाथ आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच खत उत्पादक कंपन्यांनी खताची किंमत वाढविल्यास शेतकऱ्यांसाठी अधिकच नुकसानकारक ठरेल. मान्सून काही दिवसांवर आला असून शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. हे ध्यानात घेता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी लवकरात लवकर अनुदान घोषित करावे.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक प्रभावी निर्णय घेतले आहेत व योजना सुरू केल्या आहेत.

मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी या संदर्भात भाजपाचे किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजकुमार चहर यांनाही पत्र पाठविले असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अनुदान जाहीर करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.


Back to top button
Don`t copy text!