शेतकऱ्यांना बांधावर बियाणे, खते, किटकनाशके उपलब्ध करुन द्या – पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, अकोला, दि.१४: कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी थेट बांधावर बियाणे, खते, किटकनाशके इ. कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज यंत्रणेस दिले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात खरीप हंगाम सन 2021-22 नंतरच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  यावेळी  विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, आदी अधिकारी सहभागी झाले होते.

पालकमंत्री बच्चू कडू यांनी निर्देश दिले की, सोयाबीन लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी तसेच सोयाबीन पेरणीबाबत तांत्रिक तपशील हा अधिक सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. त्यासाठी व्हिडीओ तयार करुन समाजमाध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा.  शासनाने सोयाबीन लागवडीबाबत जारी केलेला चतुःसुत्री कार्यक्रम  अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे सांगितले. शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप व पिक विमा या संदर्भात शेतकऱ्यांना तात्काळ लाभ द्यावा. त्यांना विनाकारण हेलपाटे घालावे लागू नये, तसेच बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी  कृषी सेवाकेंद्रांमार्फत  होणाऱ्या पेरणीचे नियोजन करुन बियाण्यांचे वितरण व्हावे.

प्रत्येक गावात कृषी सेवक हजर असले पाहिजे. तसेच ग्रामीण भागात कार्यरत असलेले कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, बँक कर्मचारी असे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यामार्फत ग्राम विकास कार्यक्रम राबविण्याचे निर्देश ना.कडू यांनी दिले. खते बियाणे यांच्या वाजवी दरात उपलब्धतेबाबतही प्रशासनाने नियोजन करुन दरावर नियंत्रण ठेवावे. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणाकरीता उपाययोजना कराव्या. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळत आहे याबाबत खातरजमा करावी, असेही त्यांनी यावेळी दिले.


Back to top button
Don`t copy text!