दवलामेटी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करा – मंत्री सुनील केदार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नागपूर, दि.१२: पिण्याचे पाणी अत्यावश्यक सेवेत येत असून ग्रामस्थांना दररोज नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिले. यासोबतच झुडपी जंगलांचा प्रश्न वन विभागाशी चर्चा करुन सोडवावा, असे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत दवलामेटी येथील पाणीपुरवठा नियमित करणे व जंगलाच्या जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करुन अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करण्यासंदर्भात पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरिष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद कातडे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेंद्र भुयार, जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, सरपंच व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

नळ योजनेवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करु नये, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढावेत. जेणेकरुन ग्रामस्थांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. पिण्याचे पाणी वाया जाता कामा नये, असे आदेश त्यांनी अभियंत्याना दिले. दवलामेटी ग्रामस्थांना दररोज पिण्याचे पाणी मिळेल याबाबत आठ दिवसात उपाययोजना कराव्या, असे सांगून जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्थानिकांच्या जमिनीवर झुडपी जंगल असे अभिलेख्यावर नमूद आहे. त्याबाबत तपास करुन जागेचा पंचनामा करावा व प्रश्न निकाली काढावा. तसेच वन विभागाकडून त्याबाबतची अधिसूचना मागवून घ्या. ज्या विभागाची जमीन असेल त्यांचेकडून ना-देय-प्रमाणपत्र मागवून प्रस्ताव तयार करा, त्यास शासनस्तरावर मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!