पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मेडिकल असोसिएशनच्या बैठकीत सूचना
स्थैर्य, सोलापूर, दि. 29 : शहरातील सर्व नोंदणीकृत खासगी दवाखाने सुरू ठेवावेत. नागरिकांना रुग्ण सेवा मिळाली पाहिजे. यासाठी खासगी रुग्णालय केवळ सुरू न ठेवता प्रत्यक्ष रुग्णांना सेवा द्या, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केल्या.
सोलापूर शहरातील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन आणि प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात बैठक झाली. यावेळी पालकमंत्री भरणे हे बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उपायुक्त बापु बांगर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख डॉ. हरीश रायचूर आणि प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे डॉ.सुदीप सारडा यांनी आपले म्हणणे मांडले. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी डॉक्टरांना वारंवार सूचना देऊन दवाखाने सुरू करण्यासंदर्भात सांगितले होते, तरीपण अनेक जणांनी आपले दवाखाने बंदच ठेवल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात तक्रारी आल्याचे सांगून पालकमंत्री भरणे म्हणाले की, शहरातील सर्व डॉक्टरांनी कोरोना महामारीच्या कठीण काळात रुग्णांना सेवा द्यावी. सर्व हॉस्पिटल्स सुरू ठेवावेत.
पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, शहरातील खाजगी दवाखाने सुरू राहिले तर सिविल हॉस्पिटल वरील ताण कमी होईल आणि कोरोना बाधितांना चांगले उपचार देता येणे शक्य होईल.
यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या समस्या सांगितल्या. या समस्यावर जिल्हा प्रशासनातर्फे तोडगा काढण्यात येईल. डॉक्टरांना पीपीई किट, मास्क, सुरक्षा साहित्य पुरवठा करण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. डॉक्टरांना सर्व प्रकारचे सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दवाखान्यात सेवा न मिळाल्यास त्यांनी 1800233 5044 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीस डॉ. नितीन तोष्णीवाल, डॉ. ज्योती चिडगुपकर, डॉ. व्यंकटेश मेतन, डॉ. मिलिंद शहा, डॉ. आदर्श मेहता आदी उपस्थित होते.