स्थलांतरित कुटुंबांसाठी आरोग्य सुविधा द्या – पालकमंत्री सतेज पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोल्हापूर, दि. 6 : पुराने बाधित होणाऱ्या महानगरपालिकेच्या 18 प्रभागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित  करावे. आयुक्तांनी याबाबत नियोजन केले असून तेथील सुविधांबाबतही संबंधित नगरसेवकांनी आढावा घ्यावा. निवारागृहात स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांसाठी आरोग्य सेवेच्या सुविधेबरोबर आरोग्य किटचेही वाटप करावे, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केली.

पुराने बाधित होणाऱ्या 18 प्रभागांच्या नगरसेवकांची जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीला आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महापौर निलोफर आजरेकर उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले, प्रभागांमध्ये औषध फवारणी सुरू ठेवावी. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाणी येत आहे त्या प्रभागातील नागरिकांनी मोठ्या सभागृहांमध्ये, महाविद्यालयांमध्ये स्थलांतरित करावे. याबाबत आयुक्तांनी नियोजन आराखडा केला आहे. त्या ठिकाणी नगरसेवकांनी प्रत्यक्ष पहाणी करून आणखी काही सुविधा पुरवता येतील का याबाबत सूचना करावी. तसेच नियोजन आराखड्या व्यतिरिक्त आणखी काही मोठे सभागृहे अथवा सुरक्षित ठिकाणं असतील तर ती सुचवावीत. कोरोनाच्या अनुषंगाने स्थलांतर झाल्यानंतर निवारागृहांमध्ये आरोग्य पथके ठेवावीत. त्याचबरोबर पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर यासह औषधोपचारांचे किट पुरवावेत. दूर्धर व्याधी असणाऱ्या नागरिकांची यादी प्रत्येक नगरसेवकाला द्यावी.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, छोट्या शाळांपेक्षा मोठी महाविद्यालये निवारागृहांसाठी घ्यावीत. 

महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी शाहू मार्केट सभागृह घेतले आहे. कोरोना लक्षात घेवून काही शाळाही घेतल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी आरोग्य पथकं ठेवण्यात येणार असून किटचेही वाटप केले जाईल.

यावेळी  उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे सभापती संदिप कवाळे, नगरसेवक शारंगधर देशमुख,  राहूल चव्हाण, जय पटकारे, राजाराम गायकवाड, प्रतापसिंह जाधव, शेखर कुसाळे, अर्जून माने, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी आदी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!