
दैनिक स्थैर्य । दि.०११ जानेवारी २०२२ । फलटण । सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा वाढू लागलेला आहे. त्यासाठी फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथे सरकारी रुग्णालय तातडीने चालू करण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या असलेल्या मालमत्तांवर इमारत उभी आहे. तरी त्या ठिकाणी सरकारी रुग्णालय चालू करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही करून त्या ठिकाणी निधी तातडीने देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
जिल्हा नियोजन भवन येथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची मीटिंग बोलावण्यात आलेली होती. त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी झिरपवाडी येथील असणाऱ्या सरकारी रुग्णालयात बाबत निधीची उपलब्धता करून देण्याची आग्रही मागणी केली.
फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथे असणारे सरकारी रुग्णालय तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु होणे अत्यंत आवश्यक आहे. मी खासदार म्हणून निवडून आल्यापासून सदरील रुग्णालय सुरू व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. तरी सदरील हॉस्पिटल साठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने निधी देण्यात यावा व कोरोनाला फलटण तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी सदरील रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावे, असेही यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी झिरपवाडी येथील असणारे रुग्णालय पीपीए तत्त्वावर चालविण्यासाठी आम्ही आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे परवानगी मागितली आहे व त्याबाबत मंत्रालयामध्ये मीटिंग सुद्धा झालेली आहे, असे निदर्शनास आणून दिले. यावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सदरील जागा ही शासनाची असून त्यावर इमारत सुद्धा उभी आहे. केवळ डागडुजी करून सरकारी रुग्णालय चालू होऊ शकते, तरी सदरील रुग्णालय हे सरकारी चालू करून खाजगी कोणत्याही संस्थेकडे चालवण्यास देणे योग्य नाही, असे स्पष्ट केले तर त्यावर विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदरील प्रस्ताव शासनाकडे पाठवून देण्यात यावा असे निर्देश यावेळी दिले.
सदरील रुग्णालय हे खासगी संस्था चालविण्यासाठी दिल्यानंतर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा तोटा होणार आहे. तरी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता सदरील रुग्णालय हे सरकारी रुग्णालय म्हणूनच सुरू करावे. याबाबत खासदार म्हणून मी नेहमीच आग्रही राहणार आहे, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. त्यावर पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी याबाबत आपण लवकरात लवकर मीटिंग घेऊन तोडगा काढू असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना स्पष्ट केले.