स्थैर्य, सातारा, दि.२९: ऐतिहासिक सातारा शहराच्या पूर्वेला, शहराच्या प्रवेशद्वारावर नैसर्गिकरित्या तयार झालेले आणि सध्या कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेले गोडोली तळे आहे. हे तळे सातारा शहराची नवी ओळख बनले आहे. या तळ्याच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव बांधकाम विभागाने तयार केलेला आहे. आपल्या ऐतिहासिक सातारा शहराच्या सौन्दर्यात भर घालण्यासाठी गोडोली येथील तळ्याचे सुशोभिकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे नाविन्यपूर्ण योजनेतून या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी आणि या कामासाठी निधीची तरतूद करावी अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली.
आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा- जावली मतदारसंघातील विविध प्रश्न उपस्थित करून ते सोडवण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी सातारा शहरालगत असलेल्या गोडोली तळ्याच्या सुशोभिकरणाचा महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. गोडोली तळे हे नैसर्गिक आहे. ते काही दिवसांपूर्वी कृत्रिमरीत्या तयार करण्यात आले असून हे तळे शहराची नवी ओळख बनले आहे. स्थानिकांसह शहरा बाहेरूनही असंख्य लोक तळे पाहण्यासाठी येत असतात. या तळ्याचे सुशोभिकरण आणि पुनर्जीवन केल्यास सातारा शहरात अनोखे असे पर्यटनस्थळ तयार होणार आहे. आवश्यक त्या सर्व सोयी, सुविधांचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांच्याकडून या तळ्याच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये चोहोबाजूनी संरक्षक भिंत, मुख्य व उपमुख्य प्रवेशद्वार, बगीचा, तळ्याच्या मध्यभागी गोलाकार पदपथ, सेल्फी पॉईंट, मुलांच्या खेळण्याची जागा, वृद्धांना बसण्याची जागा व ओपन जिम, बहुउद्देशीय सभागृह, स्टेज, खुले व्यासपीठ, स्वच्छतागृह आदी बाबींचा यामध्ये समावेश आहे.
तळ्याचे सुशोभीकरण झाल्यास एक ऐतिहासिक पर्यटनस्थळ निर्माण होणार असून त्यामुळे निश्चितच सातारा शहराच्या सौन्दर्यात भर पडणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन नावीन्यपूर्ण योजनेतून निधीची तरतूद करावी अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पालकमंत्र्यांकडे केली. या मागणीबाबत ना. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
टेनिस, बास्केटबॉल व हॉलीबॉल कोर्टची दुरुस्ती करा
छ. जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा विभागांच्या दुरुस्तीचाही मुद्दा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला. टेनिस, बास्केटबॉल व हॉलीबॉल कोर्टची दुरावस्था झाली आहे. खेळाडूंची संख्या वाढत असून त्यांना दर्जेदार सुविधा द्या. टेनिस, बास्केटबॉल व हॉलीबॉल कोर्टची दुरुस्ती त्वरित करा. तसेच क्रीडा संकुलातील कार्यालयाच्या बाहेरील मोकळ्या जागेमध्ये पेव्हर ब्लॉक बसवा अथवा या जागेत डांबरीकरण करा, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबतही ना. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.