
स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑक्टोबर : सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे, खोटे आणि बदनामीकारक आहेत. त्यांनी एकतर हे आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावेत, अन्यथा ४८ तासांच्या आत लेखी माफी मागावी आणि ५० कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करणारी कायदेशीर नोटीस रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट धीरज घाडगे यांनी आज पाठवली आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी ॲड. घाडगे यांनी सुषमा अंधारे यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचे पुराव्यानिशी खंडन केले. यावेळी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम व ॲड. सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
२७७ गुन्ह्यांचा आरोप धादांत खोटा
ॲड. घाडगे यांनी अंधारेंचा मुख्य आरोप खोडून काढला. “सुषमा अंधारे यांनी ऊस मुकादमांवर २७७ गुन्हे दाखल केल्याचा केलेला आरोप धादांत खोटा आहे. खुद्द फलटणच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ऊस मुकादमांविरोधात एकही गुन्हा दाखल केलेला नाही,” असे सांगत ॲड. घाडगे यांनी संबंधित पत्रच पत्रकार परिषदेत सादर केले.
नानावरे आत्महत्या प्रकरणातील नावाचा खुलासा
“नंदकुमार नानावरे आत्महत्या प्रकरणात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचा आरोपही खोटा आहे. नानावरे यांच्याच बंधूंनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन स्पष्ट केले आहे की, सुसाईड नोटमधील ‘रणजित निंबाळकर’ हे खासदार नसून, त्याच नावाचे दुसरे व्यक्ती आहेत,” असा खुलासाही त्यांनी केला.
डॉक्टर भगिनीवरील दबावाचा आरोप फेटाळला
“दिवंगत डॉक्टर भगिनीच्या निधनावरून सुरू असलेले राजकारण दुर्दैवी आहे. या भगिनीवर खोटे ‘फिट’ सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही खोटा आहे. उलट, पोलिसांनीच कामकाजातील हलगर्जीपणाबद्दल त्या डॉक्टर विरोधात त्यांच्या वरिष्ठांकडे तीन वेळा तक्रारी केल्या होत्या,” असे ॲड. घाडगे यांनी निदर्शनास आणून दिले.
इतर आरोपही निराधार
“रणजितसिंह यांनी बँकांना बुडवल्याचा आरोपही निराधार आहे. तसेच, ज्या साखर कारखान्याबद्दल आरोप होत आहेत, त्या कारखान्याच्या व्यवस्थापनाशी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा २०१९ पासून कोणताही संबंध नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
अंधारेंनीच पीडितेचे नाव घेऊन गुन्हा केला
“पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांनी पीडितेचे नाव वारंवार घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे. कायद्याने बंदी असतानाही त्यांनी पीडितेचे नाव जाहीरपणे घेतले, याचाही उल्लेख आम्ही आमच्या कायदेशीर नोटीसमध्ये केला आहे,” असे ॲड. घाडगे यांनी शेवटी सांगितले.

