
स्थैर्य, फलटण, दि. २१ ऑगस्ट : फलटण तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या पेट्रोल पंपांवर सीएनजी (CNG) सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली.
खासदार मोहिते पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चालणाऱ्या तरडगाव, बरड, वाखरी आणि भाडळी येथील पेट्रोल पंपांवर सीएनजी सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरातील वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे. वाढती मागणी आणि सीएनजी इंधनाचा किफायतशीर पर्याय लक्षात घेता, ग्रामीण भागात ही सुविधा तातडीने उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे त्यांनी मंत्री पुरी यांच्या निदर्शनास आणून दिले.
या संदर्भात संबंधित पेट्रोलियम कंपनीच्या क्षेत्रीय व्यवस्थापकांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही खासदार मोहिते पाटील यांनी केली. या मागणीमुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सोपे आणि स्वस्त होण्यास मदत होईल.
यावेळी खासदार मोहिते पाटील यांच्यासमवेत फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, संचालक अक्षय गायकवाड, शरद लोखंडे आणि सचिव शंकरराव सोनवलकर हे शिष्टमंडळ उपस्थित होते.