हजार कोटीचे कर्ज सिध्द करा राजकारणातून संन्यास घेईनं – किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांचे विरोधकांना आव्हानं

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२१ । वाई । वाईच्या विद्यमान आमदारांना सहकार क्षेत्रात आलेल्या अपयशाचे विलक्षण वैफल्प आहे . याच नैराश्यातून विद्यमान आमदार, त्यांचे बंधू व बगलबच्चे बेछूट आरोप करत आहेत. माझ्यावरील त्यांचा द्वेष मी समजू शकतो, परंतु, सहा तालुक्यातील 52 हजार सभासदांच्या मालकीच्या किसन वीर कारखान्याबाबत संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. कारखान्यावर एक हजार कोटींचे कर्ज असल्याचा डांगोरा ते पिटत आहेत; परंतु त्याच्यापेक्षा निम्मे जरी कर्ज असेल तरी मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असे खुले आव्हान किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांना दिले.

सातार्‍यात झालेल्या पत्रकार परिषदेत मदन भोसले यांनी कारखाना व्यवस्थापनाचे चेअरमन या नात्याने सडेतोड बाजू मांडत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.

मदन भोसले पुढे म्हणाले, साखर कारखाना म्हणजे काही उपजिविकेचे साधन नाही. ती आमची बांधिलकी आहे, कर्तव्यभावना आहे. 6 तालुक्यांतील 540 गावांमध्ये किसनवीर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. 52 हजार शेतकर्‍यांचे हित डोळ्यापुढे ठेवून मी निर्णय घेतलेले आहेत. किसन वीर माझ्याकडे चालवायला आला तेव्हा कारखान्यावर 1 लाख 69 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. तरी देखील अतिशय कार्यक्षमपणे आम्ही कारखाना चालवला. कारखान्यावर मोठमोठे प्रकल्प उभे करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक केली. प्रतापगड सहकारी साखर कारखाना अडचणीत आला असताना शरद पवार साहेबांच्या सूचनेखातर हा कारखाना चालवायला घेतला. कारखान्याची अवस्था अतिशय प्रतिकूल होती तरीदेखील तोच शेतकर्‍यांचा राहावा, शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये म्हणून तो कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेतला. दुष्काळी भागातील खंडाळा कारखाना देखील शेतकर्‍यांच्या मालकीचा कारखाना हवा हे जाणून या कारखान्यात देखील आर्थिक गुंतवणूक केली. हे सर्व करत असताना माझा हेतू स्वच्छ होता. माझ्या मनात कोणतेही काळेबेरे कधीच नव्हते.

मदन भोसले यांनी आमदार मकरंद पाटील, त्यांचे बंधू नितीन पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला. कारखान्याची निवडणूक घेऊन तो कारखाना आपल्या ताब्यात मिळत नाही म्हटल्यावर या मंडळींनी कारखान्याची बदनामी सुरू केली. कारखाना चालावा म्हणून 28 हजार हेक्टरवर उसाची लागवड केली. त्यासाठी महाराष्ट्र बँकेचे कर्ज उचलण्यात आले होते मात्र या कर्ज प्रकरणांमध्ये संबंधित शेतकर्‍यांची दिशाभूल करून त्यांना कोर्टात जायला त्यांनी भाग पाडलं. त्यातुनही आमचे संचालक मंडळ तावून-सुलाखून बाहेर पडलं. निर्दोष मुक्तता झाली. माझ्यावरील वैयक्तिक द्वेषापोटी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम आमदार व त्यांचे सहकारी करत आहेत. आमदारांनी विधानसभेत कर्तबगारी दाखवावी तिथे काही दाखवता येत नाही म्हणून आमच्या समोर अडचणी निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. सरकार त्यांचं असल्यामुळे चौकशीचा ससेमिरा आमच्याभोवती फिरवला जातोय. यातून विरोधकांना काहीही साध्य करता येणार नाही. शेतकर्‍यांचे हित समोर ठेवून आम्ही कारखाना चालवतोय. 15 ऑक्टोबर पूर्वी शेतकर्‍यांना संपूर्ण एफआरपीची रक्कम देऊ आणि कारखान्याला गाळप परवाना मिळवू, असा विश्वास देखील मदन भोसले यांनी व्यक्त केला.

भोसले पुढे म्हणाले, किसनवीर कारखान्याने उभारीच्या काळात शेतकर्‍यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. एफआरपीपूर्वी एसएमपी होती. त्यानुसार शेतकर्‍यांना 405 कोटी रुपये वाटणारा किसनवीर एकमेव कारखाना होता. अनेक उपक्रम उभे केले. मात्र, गेल्या तीन वर्षापासून कारखाना अडचणींचा सामना करत आहे. हेच दिवस राहत नाहीत. याच वर्षी किसनवीरने एफआरपी पूर्ण दिली नाही. मध्यंतरी काही मंडळींनी कारखान्यावर आठशे ते हजार कोटींचे कर्ज आहे, अशी अफवा उठवली. कारखान्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशा अफवा उठवणार्‍या मंडळींनी हजार कोटींचे कर्ज असल्याचे दाखवून द्यावे, मी राजकीय आणि सामाजिक जीवनातून संन्यास घेईन, असे चॅलेज भोसले यांनी विरोधकांना यावेळी दिले.

प्रतापगड व्यवस्थापनाकडून ब्लॅकमेलिंग होतंय का या प्रश्‍नावर मदनदादांनी नका बोलायला लावू असे सांगत प्रश्‍नाला बगल दिली. मात्र, मी आतापर्यंत न बोलल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने लोकांनीही विचारणा केली. मात्र, आता विरोधकांकडून अतिरेक होत असल्यानेच वस्तुस्थिती मांडण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले.


Back to top button
Don`t copy text!