
दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२२ । सातारा । नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सामील झालेल्या बंडखोरांच्या विरोधात साताऱ्यात पोवई नाक्यावर शनिवारी शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांनी जोरदार निदर्शने केली. शिवसेनेत गद्दारांना थारा नाही बंडखोर आमदारांचा निषेध असो अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्याकडे कूच करण्याचा प्रयत्न केला मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता नाट्याचे ठिकाणी पडसाद उमटत आहेत पुण्यात राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडण्यात आले असून त्याचे पडसाद आणि परिणाम साताऱ्यात शनिवारी दिसून आले. शिवसेनेचे सक्रिय प्रताप सावंत आणि उपशहर प्रमुख गणेश अहिवळे व इतर आठ ते दहा सदस्यांनी शनिवारी पोवई नाक्यावर बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष असून या पक्षांमध्ये सेनेशी गद्दारी करणार यांना अजिबात माफी मिळणार नाही, अशा घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. सातारा शहर पोलिसांना या आंदोलनाची कुणकुण आधीच लागली होती. पोलिसांनी पोवई नाका शिवाजी सर्कल तसेच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नाक्यावरील कोयना दौलत या बंगल्यावरील पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवला आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेताच शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. काही सैनिकांनी त्याच्याकडून गृहराज्यमंत्री यांच्या बंगल्याकडे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना नाक्यावरच रोखण्यात येऊन त्यांची रवानगी सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. सातारा शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता शहराच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.