दैनिक स्थैर्य । दि. २९ मार्च २०२२ । फलटण । वीज कंपन्या मधील एकतर्फी खाजगीकरण निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रातील वीज कर्मचारी, अभियंता, कंत्राटी कामगार यांच्या संयुक्त कृती समिती मार्फत फलटण विभागीय कार्यालया समोर जोरदार घोषणा देत या निदर्शने करण्यात आली. संयुक्त कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना आंदोलनाच्या प्रमुख मागण्याबाबत सविस्तर विवेचन करीत आंदोलन कर्त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
महावितरण कंपनीत करण्यात येत असलेले खाजगीकरण धोरण रद्द करण्याबाबत, केंद्र सरकारच्या विद्युत संशोधन बिल २०२१ या सरकारच्या धोरणाबाबत तीव्र विरोध, महानिर्मिती कंपनी संचलित असलेली जलविद्युत केंद्रे खाजगी उद्योगांना देण्याचे धोरण रद्द करणे,
वीज कंपन्यातील प्रास्ताविक बदली धोरण रद्द करणे आणि तीन ही कंपन्यांतील रिक्त पदे भरणे व सुत्रधारी कंपनीचा व राजकीय वाढता हस्तक्षेप बंद करणे, वीज कंपन्यातील कंत्राटी कामगाराचे शोषण थांबवून त्यांना ६० वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित नोकरीत संरक्षण व नोकरीची सुरक्षितता याबाबत हमी देणे आदी प्रमुख मागण्यांबाबत या पदाधिकाऱ्यांनी सखोल माहिती देवून मार्गदर्शन केले.
विभागीय कार्यालयातील अधिकारी, अभियंते, कंत्राटी कामगार यांच्या कृती समिती मार्फत प्रवेश द्वारावर एकत्र येऊन घोषणा देत निदर्शने करण्यात आली.