
![]() |
स्थैर्य, फलटण : दुग्धाभिषेक घालताना काशिनाथ शेवते, खंडेराव सरक, संतोष ठोंबरे, युवराज एकळ व अन्य. |
स्थैर्य, फलटण : शेतकर्यांच्या दृष्टीने महत्वपुर्ण असलेल्या दूध दरवाढ प्रश्नी शासन दाखवित असलेल्या उदासिनतेच्या निषेधार्थ फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच विठ्ठलाला दुग्धाभिषेक करुन शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. सदर प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही आंदोलकांच्यावतीने देण्यात आला आहे.
दूध दरवाढी संदर्भात रासपच्यावतीने गत महिन्यात निवेदन देण्यात आले होते. परंतू शासनाकडून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्याचा निषेध म्हणून आज दि. ६ रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास फलटण तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विठ्ठलाच्या मुर्तीला दुग्धाभिषेक केला, यावेळी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
शेतकर्याच्या दुधाला किमान ३५ रुपये भाव मिळायला हवा अथवा प्रति लिटर १० रुपये अनूदान देण्याची सदबुध्दी पांडूरंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व सरकारला द्यावी, खाजगी दूध संघ व अन्य दुध संस्था शेतकर्यांकडून कवडी मोलाने दूध खरेदी करीत आहेत. लॉकडाउनच्या नावाखाली शेतकर्यांची लूट होत आहे, अशा प्रकारची फसवणूक करणारांविरुध्द शासनाने तातडीने कारवाई करावी व शेतकर्याला न्याय द्यावा अशी मागणीही आंदोलकांच्यावतीने आंदोलन स्थळी करण्यात आली. पक्षाच्या मागण्यांचा शासनाने विचार न केल्यास अथवा त्याकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने अगामी काळात तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यानंतर आंदोलकांच्यावतीने नायब तहसिलदार अनिल ठोंबरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी रासपचे जेष्ठ नेते काशिनाथ शेवते, जिल्हा संपर्क प्रमुख खंडेराव सरक, शेखर खरात, संतोष ठोंबरे, तुकाराम गावडे, निलेश लांडगे, डॉ. युवराज एकळ, ॲड ऋषीकेश बिचुकले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.