दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२१ । सातारा । मोदी हटाओ…देश बचाओ…, मोदी सरकारचा धिक्कार असो…, अशी घोषणाबाजी करत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आज सातारा शहरातून मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध नोंदविला. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरातील व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान आज सातारा, कऱ्हाड, वाई, वडूज, खटावात बंदला प्रतिसाद मिळाला.
लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने बंदची हाक दिली होती. त्या हाकेस प्रतिसाद देत साताऱ्यासह कराड व इतर शहरात व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. तरीही तुरळक वाहतूक सुरू होती. मात्र, सकाळी महाविकास आघाडीने सातारा शहरातून मोर्चा काढून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या निर्दयी हत्या करणाऱ्यांचा धिक्कार असो.., मोदी हटाओ..देश बचाओ, मोदी सरकारचा धिक्कार असो.., मोदी सरकार हाय हाय…, अशी घोषणाबाजी करत दुकाने बंद ठेवण्याचे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. राजवाड्यापासून मोर्चास सुरवात झाली, सातारा शहरातून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल
मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा पुजा काळे, स्मिता देशमुख, राजेंद्र लावंघरे, नागेश साळुंखे, शफिक शेख, शशीकांत वाईकर, वैभव कणसे, निशा पाटील, राधिक हंकारे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, प्रदेश सरचिटणीस रजनी पवार, जिल्हा उपाध्यक्ष नंदाभाऊ जाधव, सुषमा राजेघोरपडे, माधुरी जाधव, नरेश देसाई, मनोज तपासे, नाना लोखंडे, अन्वर पाशा खान, अमोल शिंदे, तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील, सचिन मोहिते, आशिष ननावरे, अनिल गुजर, निलेश मोरे, बाळासाहेब शिंदे, प्रणव सावंत, महिला संघटीका प्रतिभा शेलार, अमोल गोसावी, प्रशांत शेळके, रमेश बोराटे, सागर साळुंखे, राहूल जाधव आदींसह कार्यकर्ते सहभाग झाले होते.
यावेळी बोलताना सातारा जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील म्हणाले, मोदी आणि योगी यांच्या भाजप सरकारने उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथे शेतकऱ्यांची हत्या केली आहे. शेतकरी देशाचा कणा असताना राजकिय स्वार्थासाठी उदयोगपती मित्रांच्या तुकड्या भरण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून कट कारस्थान चालले आहे. महाविकास आघाडी व सर्वसामान्य जनतेच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो. या कटात सहभागी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घेतला नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल. यापुढे वाढलेली महागाई आणि लखीमपूरची घटना लक्षात घेता भाजप व मोदींना सत्तेतून हटविणे हाच उद्देश आता देशातील जनतेचा असणार आहे.