दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । फलटण । भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबत केलेल्या बेताल विधानाबाबत फलटण येथे मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला. आगामी काळामध्ये कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याकडून अशी वक्तव्य झाल्यास बहुजन समाज शांत बसणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.
संविधान समर्थ मोर्चा समितीच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता. मोर्चानंतर फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप व पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्याकडे समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. फलटण येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गृहापासून ते उपविभागीय कार्यालय फलटण मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी फलटण शहरासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.
औरंगाबाद येथे भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवली असल्याबाबतचे बेताल व्यक्तव्य नुकतेच केलेले आहे. त्यामुळे बौद्ध समाज व बहुजन समाजातील सर्वसामान्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आगामी काळामध्ये कोणत्याही पक्षाकडून कोणत्याही नेत्याने जर असे वक्तव्य करण्यात आली तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.