बोंडारवाडी धरणासाठी एप्रिलमध्ये आंदोलन

डॉ.भारत पाटणकर; जलसंपदा कार्यालयासमोर करणार ठिय्या


स्थैर्य, 24 मार्च, सातारा : जिल्हाधिकार्‍यांनी निर्देश देऊनही जलसंपदा विभाग बोंडारवाडीच्या ट्रायल पीटबाबत ठोस निर्णय घेत नाही. या प्रकल्पाच्या बाबतीत जलसंपदा विभागाची भूमिका उदासीनतेची असल्याने पुढील महिन्यात 22 एप्रिलला मेढा, केळघर विभागातील 54 गावांचे नागरिक, ग्रामस्थ, शेतकरी महिला यांच्यावतीने सातारा येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत धरणाची ट्रायल पीट होत नाही तोपर्यंत 54 गावचे नागरिक आंदोलन मागे घेणार नाहीत, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

श्रमिक मुक्ती दल व बोंडारवाडी धरण कृती समिती यांच्या वतीने नांदगणे (केळघर) येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित 54 गावांच्या ग्रामस्थ, शेतकरी, महिला यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त राजेंद्र मोकाशी, जिल्हा परिषद सदस्या कविता ओंबळे, पंचायत समिती सदस्य आतिश कदम, शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश कदम, एस. एस. पार्टे, कृती समितीचे निमंत्रक आदिनाथ ओंबळे, विलासबाबा जवळ, राजेंद्र धनावडे, नारायण धनावडे, सचिन पार्टे, वैभव ओंबळे, विश्वनाथ धनावडे, आनंदराव सपकाळ, हरिभाऊ शेलार, उषा उंबरकर, श्रीरंग बैलकर, जगन्नाथ जाधव, नारायण सुर्वे, एकनाथसपकाळ उपस्थित होते.

डॉ. पाटणकर म्हणाले, मोठमोठ्या उद्योगपतींच्या जलसिंचन प्रकल्पासाठी शासन प्रसंगी पोलीस दलाचा गैरवापर करून शेतकर्‍यांच्या जमिनी हस्तगत करून त्या उद्योग पूर्ण होण्यासाठी शासन पायघड्या पसरते. मात्र लोकशाही मार्गान आंदोलन करून देखील गेल्या 15 वर्षांपासून बोंडारवाडी धरणाची साधी ट्रायल पीट प्रशासन करत नाही. या प्रकल्पाबाबतप्रशासन वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याने प्रशासनाला जाग येण्यासाठी श्रमिक मुक्ती दल व कृती समिती 54 गावांतील नागरिक, ग्रामस्थ, महिला यांना सोबत घेऊन पुढील महिन्यात 22 तारखेला जलसंपदा विभागाच्या सातारा येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे. या धरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत एकही ग्रामस्थ जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोरुन हलणार नाही, असा इशाराही डॉ. पाटणकर यांनी दिला आहे.

ट्रायल पीटसाठी विरोध करू नका बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तीव्र जनआंदोलन केलेजाईल. हा लढा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे. या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या शेतकर्‍यांचे योग्य ते पुनर्वसन झाले पाहिजे ही भूमिका आधीपासूनच आहे. आधी पुनर्वसन मग धरण झाले पाहिजे. ट्रायल पीट झाली म्हणजे धरण झाले असे नाही त्यामुळे ट्रायल पीट साठी कुणीही विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

आदिनाथ ओंबळे म्हणाले, 54 गावांत पाणी नसल्याने युवकांचे स्थलांतर शहरांकडे वाढले आह., युवकांना रोजगार नाही, शेतीला पाणी नाही तसेच पशुधनही कमी झाले आहेत., गावे ओस पडली असून शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जर बोंडारवाडी धरण झाले तर शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती होईल. एक टीएमसी क्षमतेचे धरण शासनाने मंजूर केले मात्र प्रशासन ट्रायल पीट करत नसल्याने या विभागातील जनता नाराज असून प्रत्येक निवडणुकीत या धरणाचा प्रश्न सोडवू असे आश्वासनराजकीय नेते देतात मात्र निवडणूक झाली की मात्र या प्रश्नाला सोईस्कर पणे बगल दिली जाते. हे थांबले पाहिजे. प्रकल्प ग्रस्तांचे पुनर्वसन योग्य त्या ठिकाणी होण्यासाठी कृती समिती सकारात्मक व आग्रही आहे.

यावेळी सदाशिव सपकाळ, अंकुश कदम, एस. एस. पार्ट, विलासबाबा जवळ, श्रीरंग बैलकर, वैभव ओंबळे, हरिभाऊ शेलार, उषा उंबरकर यांच्यासह विविध गावच्या सरपंच, उपसरपंच यांनी मनोगत व्यक्त केले. एकनाथ सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ ओंबळे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!