
स्थैर्य, औंध, दि. 01 : केंद्र सरकार अन्यायकारक पध्दतीने लादू पहात असलेल्या शेतकरी, ग्राहक, अधिकारी कर्मचारी विरोधी वीजकायदा बील 2020 चा जाहीर निषेध करण्यासाठी सबाँर्डीनेट इंजिनिअर असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांनी उर्जा क्षेत्रातील खाजगीकरणाच्या निषेधार्थ आज सर्वत्र काळ्या फिती लावून काम केले.
केंद्र शासनाच्या धोरणामुळे देशभरातील सामान्य शेतकरी, औद्योगिक ग्राहक गरीब जनतेला येत्या काळात खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.सरकारच्या नवीन धोरणामुळे उर्जा क्षेत्रातील राज्य सरकारच्या अधिकारावर निर्बंध येणार आहेत. यामुळे सामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सबसिडीला कात्री लागणार आहे.
याबाबतीत सर्व अधिकार केंद्र सरकारकडे जाणार असून शासनाचे धोरण खाजगी कंपनीला पोषक आहे. त्यामुळे उर्जा क्षेत्रात अनागोंदी कारभार निर्माण होणार आहे. एकीकडे कोरोनाचे भीषण संकटामुळे जनता हवालदिल झाली असताना केंद्र शासनाने हा अन्यायकारक कायदा राबविण्याचे धोरण निश्चित केले आहे.
कोरोनामुळे उर्जा क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार नसले तरी देखील या अन्याय कारक कायद्याचा निषेध म्हणून आज सर्वत्र महावितरण, पारेषण महानिर्मिती विभागातील सर्वांनी काळ्या फिती लावून काम करून शासनाचा निषेध केला. शासनाने हा कायदा रद्द केला नाही तर याबाबत लवकरच मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.