
दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२२ । सातारा । मानवाधिकार कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड व इतर दोघा माजी शासकीय अधिकाऱ्यांवर गुजरात पोलिसांकडुन करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईचा निषेध करणारे निवेदन व या प्रकरणी राष्ट्रपतींनी स्वतः लक्ष घालून त्यांची त्वरित सुटका करावी अशी राष्ट्रपतींकडे विनंतीवजा मागणी करणारे निवेदन आज सातारा येथील विविध पुरोगामी व परिवर्तनवादी संघटना आणि कार्यकर्ते यांच्यावतीने सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले.
गुजरात मधील २००२ साली झालेल्या हत्याकांडातील प्रत्यक्ष पिडितांना न्याय मिळावा म्हणून सतत प्रयत्नशील असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड व माजी पोलीस अधिकारी श्री कुमार तसेच संजीव भट्ट यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. खरे तर तीस्ता सेटलवाड यांना कोणतीही पूर्वसूचना न देता गुजरात पोलिसांनी अटक केलेली आहे. तसेच त्यांना मारहाणही करण्यात आलेली आहे. ही गोष्ट अत्यंत चुकीची असून आम्ही त्याचा निषेध नोंदवित आहोत अशा प्रकारचे निवेदन सातारा येथील जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अमिता देशमुख यांनी स्वीकारले. राष्ट्रपती यांच्या नावाने हे निवेदन देण्यात आलेले आहे.
निवेदनात म्हटले आहे की मानवाधिकाराच्या संदर्भात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळेत न्याय मिळालेला नाही अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे तीस्ता सेटलवाड यांनाही वेळेत न्याय मिळणार नाही अशी आम्हाला भीती वाटते म्हणूनच भारतीय संविधानाच्या चौकटीत दलित , शोषित वर्गासाठी काम करणाऱ्या सर्वांनाच न्याय मिळावा आणि सेटलवाड यांची योग्य ती कार्यवाही करून त्वरित सुटका करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना एडवोकेट राजेंद्र गलांडे , जयंत उथळे ( मुक्तीवादी संघटना) , प्रशांत पोतदार (महाराष्ट्र अंनिस ) , मिनाज सय्यद (मुस्लिम जागृती अभियान) , विजय मांडके (विद्रोही सांस्कृतिक चळवळ , महाराष्ट्र) , सौ वैशाली मुसळे आणि आरिफ शेख (संभाजी ब्रिगेड ) , प्रा संजीव बोंडे (राज्य महिला लोक आयोग ) , भगवान अवघडे (राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलन) , गिरीश जाधव (विमा कर्मचारी संघटना सातारा) , हेमा सोनी (सत्यशोध) , सलीम आतार ( सीटू) ,दिनकर झिंब्रे ( संबोधी प्रतिष्ठान ) , भगवान गावडे , माणिक अवघडे व सौ. आनंदी अवघडे ( मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ) हे कार्यकर्ते उपस्थित होते.