बुधवार दि. २४ जून रोजी पासून वाढे फाट्यावर बेमुदत रस्ता रोको करणार
स्थैर्य, सातारा, दि. 20 : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची यंत्रणा लॉकडाऊनमध्ये चांगली सुस्तावलेली आहे. बांधकाम झालेपासून महामार्गाच्या बाजूची गटार तुंबल्याने गेली चार महिने अनेकांच्या घरात, गँरेजमध्ये मैलामिश्रीत सांडपाणी शिरलेले आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सतत संपर्क करून हे ते दुर लक्ष करत आहेत. शनिवार सकाळी वाढे फाटयावर सांडपाण्यात श्रीफळ आणि फुले वाहून स्थानिकांनी निषेध केला. यावेळी बुधवार दि. २४ जून रोजीपासून वाढे फाट्यावर बेमुदत रस्ता रोको करणार असल्याचा इशारा वाढेचे उपसरपंच युवराज नलावडे यांनी दिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामकाज आणि देखभालीवर सातारकर चिडून आहेत. आनेवाडीचा टोल नाका हटाव या मोहिमेच्या आंदोलनानंतर वटणीवर आलेल्या प्राधिकरणाने रस्ताची डागडुजी केली. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली गटारे तुंबल्याने दुर्गंधी मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. हे आजूबाजूच्या घरात आणि गँरेजमध्ये जात असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. सांगपाण्यात श्रीफळ आणि फुले टाकून स्थानिकांनी यंत्रणेचा निषेध व्यक्त केला. आता पुन्हा या यंत्रणेविरोधात वाढे फाट्यावरील व्यवसायिक, स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सतत अनेक जण माहिती देत असून ते संबंध नसल्यासारखे बोलत आहेत. यामुळे परिसरातील व्यवसायिक आक्रमक झाले असून बुधवार दि.२४ जून रोजी वाढे फाट्यावर रास्ता रोको करणार आहेत. यावेळी शहर पोलिसांनी तत्काळ महामार्ग प्राधिकरणाची देखभाल करणाऱ्या रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना याबाबत दखल घेऊन योग्य कारवाई करण्यास सांगितले.
यावेळी महेंद्र भोईटे, विरेन साके, सागर अडलिंगे, अनिल भोईटे, मुन्ना मिस्त्री, अनिष खान, सिकंदर शेख, मोगहल पालकर यांनी बेमुदत रस्ता रोको करणार असल्याचे सांगितले.